अनेक ठिकाणी भूस्खलन, रेल्वेसेवा विस्कळीत

केरळात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून काही भागात रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, असे शनिवारी सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी पर्वतीय भागात धोक्याचा इशारा दिला असून नदी किनारी राहणारे लोक व पर्यटन केंद्रांना सावध करण्यात आले आहे.

तिरुअनंतपुरम जिल्ह्यात धोक्याचा लाल बावटा देण्यात आला असून तेथे अति जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोल्लम, पथमनथिट्टा, अलापुझा, कोट्टायम, इडुकी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता असून तेथे र्नांरगी बावटा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस असून मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. भूस्खलन व पूरग्रस्त भागात विशेष काळजी घेण्यात येत आहे. पश्चिमी वाऱ्यांमुळे केरळात जोरदार पाऊस सुरू असून तिरुअनंतपुरम व कोल्लम जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. यापुढेही जोरदार पावसाची शक्यता असल्याने उंचीवरील भाग, नदी किनाऱ्यालगतचे भाग येथे दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.

बंगालच्या उपसागरात अंदमान सागरामध्ये कमी दाबाचा नवीन पट्टा तयार होत असून तो १५ नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरात मध्य पूर्वेकडे सरकेल. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले की,  २५ नोव्हेंबरपर्यंत  केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी रात्रीपासून तिरूअनंतपुरम येथे जोरदार पाऊस सुरू असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. नेयर्नंटकारा परासाला रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे. एरानियल-कुलीथुराई मार्गावर पाणी साचले आहे. नगरकॉइल-कन्याकुमारी भागातही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. काही मार्गावरील रेल्वे सेवा अंशत: सुरू आहे.

नेयर्नंटकारा येथे राष्ट्रीय महामार्गावर असलेला एक पूल वाहून गेला असून विझनजम या गावात दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. विथुरा, पोनमुडी, नेदुमंगाडू, पलोडे येथे संततधार पाऊस सुरू आहे.