ईशान्य मान्सूनच्या पावसाने आता चेन्नईत उघडीप दिली असून, पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. पाणी झपाटय़ाने ओसरत असून मदतकार्य सोपे होत आहे. पावसाने मोबाइल सेवा कोलमडली होती, ती काही प्रमाणात सुधारली आहे. एटीएम व इतर सेवा बंद आहेत. पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या २६९ झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणीनंतर मुख्यमंत्री जयललिता यांची भेट घेऊन एक हजार कोटींची मदत जाहीर केली. याधी ९४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दिल्लीच्या वृत्तानुसार राष्ट्रीय आपत्ती दलाची आणखी २० पथके पाठवण्यात आली असून, दहा हजार जणांना वाचवण्यात आले आहे. इंधनाचा पुरवठा थांबला असून, शहरात पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागल्या आहेत.
पाऊस थांबल्याने चेम्बरापक्कम, पोंडी व पुझल या तलावांचे पाणी ओसरले आहे. दोन नद्यांची पाणीपातळीही कमी झाली आहे. अनेक भागांत पाणी ओसरत असले तरी नागरिकांच्या हालअपेष्टा अजून सुरूच आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक भागांत वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. पिण्याचे सुरक्षित पाणी मिळणे कठीण झाले आहे. दूध व वृत्तपत्रे यांचा पुरवठा विस्कळीत असून भाज्या चढय़ा दराने विकल्या जात आहेत. वाहतूक सेवा हळूहळू वेग घेत आहे. चेन्नईतील अराकोनम येथील राजाली नौदल हवाई केंद्रावरून काही विमान उड्डाणे झाली. चेन्नई अराकोन्नम पट्टय़ातील रेल्वे सेवा विस्कळीत आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की तांबारम व चेन्नई बंदरानजीकची रेल्वेसेवा सुरू करण्यात येईल. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने ९ हजार लोकांची सुटका केली आहे. या दलाचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले, की आज पाणी ओसरले असून, जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा इरादा आहे. पुणे व पाटणा येथून आपत्ती निवारण दलाची दहा पथके तामिळनाडूत आणली आहेत. आज सकाळी पाच पथके येथे दाखल झाली. दलाची एकूण ३० पथके असून त्यात प्रत्येकी ४० जवान आहेत. आपत्ती निवारण दलाकडे फुगवता येणाऱ्या व इतर प्रकारच्या ११० बोटी आहेत. भारतीय हवाई दलाने मीनाबंकम व अराकोनम तसेच तांबारम हवाई तळादरम्यान हवाई पूल बांधला आहे. १२० जणांना सुपर हक्र्युलिस हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले. १०० जणांची मीनाबंकम विमानतळ भागातून सुटका करण्यात आली, असे हवाई दलाचे अधिकारी एअर मार्शल एस. आर. के. नायर यांनी सांगितले.