भारतीय लष्करातील १२ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर मुदतपूर्व निवृत्ती घेतलेले मेजर ऋषभ सिंग सांब्याल सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषभ सांब्याल यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ‘एडीसी’ (Aide-de-Camp – अंगरक्षक/सहाय्यक) म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अलीकडेच राज शमानी यांच्यासोबतच्या मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सैन्यातील खडतर प्रवासाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

राष्ट्रपतींचे एडीसी म्हणून काम करण्यासाठी नेमकी कोणती अट असते?

राज शमानी यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ सांब्याल यांनी राष्ट्रपतींचे एडीसी असतानाच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत असताना वैयक्तिक आयुष्याचा कसा त्याग करावा लागतो, याबद्दल त्यांनी भाष्य केले.

“मी अद्याप अविवाहित आहे. राष्ट्रपतींचे एडीसी (ADC) म्हणून काम करताना लग्नाबाबत ठराविक नियम आणि अटी असतात. या पदावर कार्यरत असताना लग्न करता येत नाही. त्यामुळे मला माझ्या कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहावे लागले. माझ्या मते, सैन्यात सेवेत असताना मी केलेला हा सर्वात मोठा त्याग होता,” असे ऋषभ यांनी सांगितले.

सामान्यांसारखे आयुष्य जगता येत नाही

राष्ट्रपतींच्या एडीसी पदावरील कार्यकाळाबद्दल बोलताना सांब्याल म्हणाले, “या पदावर असताना तुम्हाला खाजगी आयुष्य उरत नाही. सेवा बजावत असताना एका सर्वसामान्य माणसासारखे बाहेर फिरणे किंवा आयुष्याचा आनंद घेणे शक्य नसते. हा एक प्रकारचा मोठा त्यागच आहे.”

एकटेपणा आणि स्वतःचा शोध

सतत व्यस्त दिनक्रम आणि कडक शिस्तीमुळे कधी एकटेपणा जाणवला का, असा प्रश्न विचारला असता सांब्याल यांनी सकारात्मक उत्तर दिले. “मला एकटेपणा नक्कीच जाणवायचा, पण मी त्या एकटेपणाला नेहमी सकारात्मकतेत बदलले. मला दिवसातून किमान एक तास पूर्णपणे एकटे राहणे आवडते. या एका तासात माझ्या आसपास कोणीही नसणे गरजेचे असते. हा वेळ मला स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी, माझ्या विचारांवर आणि आयुष्यातील बऱ्या-वाईट गोष्टींवर विचार करण्यासाठी मदत करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

एडीसी बनण्याचे कोणतेही नियोजन नव्हते

विशेष म्हणजे ऋषभ सांब्याल यांनी लष्करात प्रवेश केला तेव्हा त्यांना ‘एडीसी’ या पदाबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. “मला एडीसी या पदाविषयी काहीही माहिती नव्हती. मला या पदावर जायचेही नव्हते. ज्यावेळी माझी या पदासाठी निवड झाली, त्यावेळी मी सैन्याच्या एका विशेष युद्धअभ्यासात व्यस्त होतो,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

कमांडींग ऑफिसरने (CO) जेव्हा निवडीबाबत विचारले, तेव्हा सुरुवातीला त्यांनी फारसा रस दाखवला नव्हता. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर आणि या पदावरून मिळणाऱ्या अनुभवाचे महत्त्व समजल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

निवृत्तीच्या निर्णयाबाबत मेजर ऋषभ सिंग सांब्याल काय म्हणाले?

निवृत्तीच्या निर्णयावर विचार करण्यासाठी चार महिने घालवले, असे सांब्याल यांनी ‘द प्रिंट’ला माहिती देताना सांगितले. “माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण निर्णय आहे. मला काही कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत. हा निर्णय घ्यावा लागेल असा मी कधी विचारही केला नव्हता. खूप वेदनादायी होते. निर्णय जाहीर करण्यासाठी खूप वेळ लागला,” असे सांब्याल यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना सांगितले.

निवृत्तीनंतर काय करणार?

ऋषभ सांब्याल यांनी निवृत्तीनंतर काय करणार, याबाबतही खुलासा केला. तसेच भविष्यातील योजनांवर काम करण्यास सुरुवात केल्याचेही नमूद केले. “मी एक मॉडेल तयार करतोय, त्यात तरुणांना प्रेरित करणे हा एक भाग आहे. मी देशाच्या विकासासाठी काम करेन आणि त्याबरोबर माझीही प्रगती होईल. मी यावर काम करतोय,” असे सांब्याल म्हणाले. सांब्याल यांनी दैनंदिन काम आणि वर्दीची आठवण येत असल्याचेही ‘द प्रिंट’शी बोलताना नमूद केले.