राज ठाकरेंच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो-विनोद तावडे

विनोद तावडेंनी राज ठाकरेंच्या सभांची खोचक शब्दात खिल्ली उडवली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये शो पार पडला आता लवकरच महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडी शो पार पडणार आहेत असंही तावडे यांनी उपरोधाने म्हटले आहे.

राज ठाकरे सध्या मोदी आणि अमित शाह यांना संपवण्याची भाषा करत आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, उरलेसुरले नगरसेवकही पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे स्वतःचा पक्ष संपलेला असताना दुसऱ्याला संपवण्याची भाषा राज ठाकरे करत आहेत असाही टोला तावडे यांनी लगावला.

राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत स्वतः कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. त्यांच्या जाहीर सभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन करत आहेत. त्यामुळे या सभांचा खर्च त्या ठिकाणच्या उमेदवाराच्या खात्यात धरण्यात यावा अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे लवकरच करणार आहोत असेही तावडे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या जाहिर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही तावडेंनी म्हटलं आहे.

भाजपात ज्यांनी प्रवेश केला त्यांची कागदपत्रे माझ्याकडे असून निवडणुका संपल्यानंतर ती कागदपत्रे दाखवेन असे विधान करणा-या अजित पवार यांच्यावरही तावडेंनी टीका केली.ते म्हणाले की, अजित पवार फक्त हूल देत आहेत. अजित पवार हे कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. कबड्डी खेळामध्ये खेळाडूला एखादा गडी बाद करता आला नाही तर तो फक्त मैदानात प्रवेश करतो आणि प्रतिस्पर्धी संघाला नुसती हुल मारुन येतो, तसा अजित पवार यांचा फक्त हुल मारण्याचा प्रकार आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj thackerays speeches for election is like a stand up comedy show says vinod tawde

ताज्या बातम्या