Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयात हनिमूनदरम्यान झालेल्या इंदूर येथील २९ वर्षीय राजा रघुवंशी याच्या हत्येच्या चौकशीत एक नवीन नाव समोर आले आहे. तपासात पूर्वी अज्ञात असलेला संजय वर्मा हा राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच्याशी लग्नापूर्वी आणि नंतरही मोठ्या प्रमाणावर दूरध्वनीवरून संपर्कात होता, असे आढळून आले आहे.
पोलिसांनी मिळवलेल्या कॉल डेटा रेकॉर्डनुसार, १ मार्च ते २५ मार्च दरम्यान सोनम रघुवंशीने संजय वर्माला ११९ कॉल केले होते. त्याचा मोबाईल नंबर सध्या बंद आहे.
२३ मे रोजी, मेघालयातील पूर्व खासी हिल्समध्ये राजा रघुवंशीची हत्या करून त्याचा मृतदेह वेई सावडोंग धबधब्याजवळील दरीत फेकून देण्यात आला होता. त्यानंतर १० दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम रघुवंशीने प्रियकर राज कुशवाह याच्या तीन मित्रांना सुपारी दिली होती. या तीन हल्लेखोरांपैकी विशाल सिंग चौहानने राजावर प्रथम दाओने (एक प्रकारचा चाकू) वार केले. त्यावेळी सोनमही घटनास्थळी होती. राजाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि तो ओरडू लागला, तेव्हा ती घटनास्थळावरून पळून गेली.
सुरुवातीला पोलिसांना वाटले होते की राजा रघुवंशीला फक्त एकाच “दाओ” ने मारण्यात आले आहे. पण, मंगळवारी गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपींना नेले तेव्हा पोलिसांना हल्लात वापरलेल्या दुसऱ्या शस्त्राबद्दल माहिती मिळाली.
विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी हे तिघे हल्लेखोर सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहा याचे मित्र होते. त्यानेच सोनमला या तिघांशी भेट घालून दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सोनम रघुवंशीने पती राजाच्या केवळ हत्येचा कट रचला नाही, तर तिने हल्ला सुरू करण्याचे संकेत देऊन नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासही मदत केली, असे पोलिसांचे मत आहे.
दरम्यान राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर पत्नी सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये पोलिसांसमोर शरण आली होती. पोलिसांनी तिला अटक करून चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड झाली होती. याचबरोबर राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी सोनमचा प्रियक राज कुशवाह आणि त्याच्या हल्लेखोर मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या सर्व आरोपी मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत.