Raja Raghuvanshi Murder Case : गेल्या काही दिवसांपासून इंदूरमधील राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा सुरु आहे. राजाची पत्नी सोनम ही या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलिसांनी तिला अटक केलं आहे. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि आणखी काही मारेकऱ्यांच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. यातच आता या प्रकरणातील आरोपींची नार्को चाचणी करण्यात यावी, अशी मागणी राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी यांनी केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे. विपिन रघुवंशी यांनी म्हटलं की, “चौकशी दरम्यान सोनमसह दुसऱ्या आरोपींच्या वागण्याने संशय निर्माण झाला आहे. सोनम आणि राज ज्या पद्धतीने पोलिसांना दिशाभूल करत आहेत ते धक्कादायक आहे. पण एकदा नार्को चाचणी झाली की, सोनम किती खोटं बोलत आहे हे उघड होईल”, असं विपिन रघुवंशी यांनी म्हटलं आहे.
“सर्व आरोपी खोटं बोलत असल्याचा संशय आहे. मी याबाबत सोनमच्या पालकांशी बोलू शकत नाही. पण त्यांनी माध्यमांद्वारे कोणतंही विधान का केलं नाही? आता दावा केला जात आहे की राज हा सोनमला राखी बांधत होती. मग त्यांच्याबाबत तिच्या आईला हे माहित नव्हतं का? पोलिसांनी तिच्या पालकांची देखील चौकशी करण्याची गरज आहे. तुम्ही सर्वांनी हे माध्यमांपासून आणि पोलिसांपासून का लपवलं आहे?”, असा सवाल विपिन रघुवंशी यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
इंदूरमधील राजा रघुवंशी व सोनम रघुवंशी या दोघांचं ११ मे रोजी लग्न झालं होतं. त्यानंतर २० मे रोजी दोघेही मेघालयमधील शिलॉन्ग येथे मधुचंद्रासाठी गेले होते. मात्र २३ मेपासून दोघांचाही त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क बंद झाला. दोघेही बेपत्ता असावेत किंवा त्यांचं अपहरण झालं असावं अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यानंतर २ जून रोजी शिलॉन्गमधील एका दरीत राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडला. तेव्हा सोनमचं अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र ९ जून रोजी सोनम पोलिसांना शरण आली. प्राथमिक तपासात सोनमनेच राजाच्या खूनाचा कट रचल्याचं समोर आलं आहे.