Raja Raghuvanshi Murder Case : गेल्या काही दिवसांपासून राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे चांगलेच चर्चेत आले आहे. मेघालय येथे हनिमूनसाठी गेलेल्या या दोघांपैकी राजा याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सोनमनेच तिच्या काही साथिदारांबरोबर मिळून त्याची हत्या केल्याची बाबा उजेडात आली. यानंतर आता या प्रकरणात आणखी खुलासे केले जात आहेत. पतीची हत्या केल्यानंतर सोनमने इंदोरमध्ये घर भाड्याने घेऊन राहिल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडल्यानंतर सोनम कथितपणे बेपत्ता होती, पण ती हत्या झाली तेथून पळून गेली आणि इंदोरमध्ये तीन मारेकऱ्यांपैकी एकाने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहात होती.

हा फ्लॅट विशाल सिंह चौहान याने भाड्याने घेतला होता. राजा रघुवंशीवर धारधार शस्त्राने हल्ला करणारा विशाल हाच पहिला आरोपी होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हत्या करताना त्याच्याबरोबर आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी हे देखील होते.

सूत्रांनी सांगितले की, विशालच्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावर हे घर भाड्याने घेण्यात आले होते. विशेष म्हणजे जेव्हा देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू असताना हत्या झाल्याच्या सात दिवसानंतर म्हणजेच ३० मे रोजी हा फ्लॅट भाड्याने घेण्यात आला होता.

फ्लॅट भाड्याने घेताना त्याने पोलीस व्हेरिफिकेशन देखील केले होते. तसेच त्याने आपण इंटेरियर डिझायनर असून राहण्यासाठी फ्लॅट शोधत असल्याचे सांगितले होते. हाच तो फ्लॅट आहे जेथे राजाची हत्या केल्यानंतर सोनम लपून राहिली होती.

या फ्लॅटसाठी १६,००० रुपये अडव्हान्स देखील घरमालकाला देण्यात आला होता, असेही सूत्रांनी सांगितले. सोनमचा प्रियकर राज कुशवाह याने या प्रकरणाचा कट रचला असे पोलिसांनी सांगितले, तसेच त्यानेच सोनमसाठी या फ्लॅटवर ५,००० रुपयांचे रेशन मागवले होते अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं झालं काय होतं?

मेघालय येथे हनिमूनसाठी गेलेले २९ वर्षीय राजा आणि २४ वर्षीय सोनम हे अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर काही दिवसांनी राजाचा मृतदेह सापडला आणि या नंतर प्रकरणाने वेगवेगळी वळणे घेतली. पण या प्रकरणाच्या सुरुवातीला सोनम बेपत्ता झाल्याचे बोलले जात होते. या जोडप्याचे ११ मे रोजी लग्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमचे राजशी संबंध होते. हा राज सोनमच्या कुटुंबाच्या मालकीच्या फर्निचर शीट युनिटमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि सोनम देखील कुटुंबाच्या व्यवसायत मदत करत असे.

इंदोर येथे लग्न झाल्यानंतर सोनम आणि राजा हे दोघे हनिमूनसाठी मेघालय येथे गेले. पण २३ मे रोजी दोघे बेपत्ता झाले, त्यानंतर ते उतरले होते त्या होमस्टे पासून २० किमी अंतरावर २ जून रोजी राजा याचा मृतदेह सापडला.

त्यानंतर कथित बेपत्ता झालेल्या सोनमचा शोध सुरू झाला अखेर ती ८ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये आढळून आली आणि नंतर तिने नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आकाश, विशाल आणि आनंद यांना अटक करण्यात आल्यानंतर सोनम पोलिसांसमोर हजर झाली. यानंतर राजलाही अटक करण्यात आली.

सोनमने बुधवारी तिच्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली आहे . पोलिसांनी सांगितले की तिचा चुलत भाऊ जितेंद्र रघुवंशी याने तिन्ही मारेकऱ्यांना पहिला हप्ता दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.