Sonam Raghuvanshi claims Being Drugged : देशभर सध्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची बरीच चर्चा होत आहे. या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आतापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा गंभीर दावाही पोलिसांनी केला आहे. अशातच सोनमने दावा केला होता की तिला अंमली पदार्थ देऊन गाझीपूरला आणलं होतं. मात्र, पोलिसांनी तिचा दावा फेटाळला आहे.

खासी हिल्सचे (पूर्व) पोलीस अधीक्षक विवेक सय्यम यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की “सोनमला माहिती होतं की या हत्या प्रकरणातील तिचा साथीदार राज कुशवाह याची चौकशी चालू आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाईल. म्हणून तिने स्वतःला वाचवण्यासाठी किंवा पीडिता म्हणून स्वतःला सादर करण्यासाठी हे दावे केले आहेत. ड्रग्ज देऊन माझं अपहरण करण्यात आलं व मला गाझीपूरला आणण्यात आलं असा दावा तिने केला आहे जो आतापर्यंतच्या तपासानुसार खोटा असल्याचं दिसून येत आहे. तिने तिचा प्रियकर व मित्रांबरोबर हत्येचा कट रचल्याचं कबूल केलं आहे”.

सोनमचा दावा काय?

विवेक सय्यम म्हणाले, “सोनमला मंगळवारी शिलाँगला नेण्यात आलं आहे. बुधवारी (११ जून) तिला न्यायालयात हजर केलं जाईल”. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं होतं की “सोनम गाझीपूर जिल्ह्यातील एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या ढाब्यात सापडली होती. ती म्हणत होती की तिला ड्रग्ज दिले होते. ती गाझीपूरमध्ये कशी आली हे तिलाच माहिती नाही”.

दरम्यान, या हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश राजपूत व सोनम रघुवंशी यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. यापैकी सोनमवगळता इतर तिघांची सात दिवसांसाठी ट्रान्झिट कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. २ जून रोजी राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडला होता. मात्र, त्याची पत्नी सोनम त्या दिवसापासून बेपत्ता होती. ९ जून रोजी ती गाझीपूरमध्ये सापडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नानंतर सातच दिवसांत पतीच्या हत्येचा कट रचला

दरम्यान, सोनमने १८ मे रोजीच तिचा पती राजा रघुवंशी याची हत्या करण्याचा कट रचल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे. हा कट रचायच्या सात दिवस आधीच तिने राजाशी लग्नगाठ बांधली होती.