Sonam Raghuvanshi Arrested In Raja Raghuvanshi Murder Case: सोनम रघुवंशीला पती राजा रघुवंशी याची हनिमूनसाठी मेघालयात गेल्यानंतर हत्या केल्याच्या आरोपाखाली काल अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राजा रघुवंशीबरोबर लग्न ठरवताना सोनमला विचारण्यात आले होते की, तिला राजाशी विवाह मान्य आहे का, की तिच्या मनात दुसरे कोणी आहे? यावर सोनमने हे लग्न तिला मान्य असल्याचे सांगितल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.
राजा रघुवंशी याच्या हत्येनंतर, “जर सोनमला प्रियकर होता तर तिने लग्न का केले, त्यावेळीच तिने लग्नाला का नकार दिला नाही? राजाची हत्या का केली?”, असा सवा राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी केला आहे.
दरम्यान, कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा आणि सोनमचे लग्न पारंपरिक आणि सामूहिक पद्धतीने ठरवण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या मान्यतेने ११ मे रोजी राजा आणि सोनमचा विवाह पार पडला.
…आणि तिच्या कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधला
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना राजाची आई उमा रघुवंशी म्हणाल्या, “हे लग्न इतर सामान्य लग्नासारखेच पार पडले. आम्ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आमच्या समाजाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेसाठी तसेच ऑनलाइन विवाह संकेतस्थळावर नोंदनी करण्यासाठी राजाचा बायोडेटा तयार केला होता. जेव्हा आम्हाला सोनमचा बायोडेटा मिळाला आणि तिच्या कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधला, तेव्हा आम्ही त्यांना भेटण्यास तयार झालो.”
प्रत्येकाने तिच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या
हे लग्न ठरवण्यापूर्वी राजाच्या कुटुंबीयांनी सोनमच्या शेजारी राहणाऱ्या अनेक नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी चर्चा केली होती. “आम्ही ज्यांच्याशी बोललो त्यांच्यापैकी प्रत्येकाने तिच्याबद्दल चांगल्या गोष्टीच सांगितल्या. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला”, असे राजाची आई उमा रघुवंशी यांनी सांगितले.
तुझ्या मनात दुसरे कोणी आहे का?
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाब बोलताना सोनमचे वडील देवी सिंग म्हणाले की, “आम्ही जेव्हा या लग्नाच्या प्रस्तावावर चर्चा करत होतो तेव्हा सोनम एका मैत्रिणीसोबत बसली होती. मी तिला स्पष्टपणे विचारले की, तुझ्या मनात दुसरे कोणी आहे का? तुला हे लग्न मान्य आहे का? यावर तिने लगेच नाही म्हटले आणि मला सांगितले की मी ज्याच्याशी लग्न ठरवेन त्याच्याशी ती लग्न करेल,” असे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.