Rajasthan Ajmer Crime News: राजस्थानमधील थरारक आणि धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. ​कौटुंबिक वाद, वारसाहक्काच्या मालमत्तेचे मतभेद यातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे १७ वर्षीय मुलाने हे हत्याकांड घडवून आणले आहे. यासाठी तो अनेक महिन्यांचे नियोजन करत होता अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. अजमेरचे माजी सरपंच रामसिंग चौधरी, त्यांची दुसरी पत्नी, आई आणि भाची यांची हत्येने राजस्थानसह देश हादरला आहे. या हत्याकांडाच्या आतापर्यंतच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

अल्पवयीन मुलावर संशय बळावला

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, एका जळालेल्या कारमध्ये अजमेरचे माजी सरपंच रामसिंग, त्यांची दुसरी पत्नी सुरग्यान, आई पुसी देवी आणि भाची महिमा यांचे मृतदेह सापडले होते. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब शोकाकूल असताना, रामसिंग यांचा १७ वर्षांचा मुलगा मात्र अत्यंत शांत होता. त्याची आई रडत असतानाही तो तिच्या शेजारी शांतपणे बसून, तिला धीर देत चहा पीत होता. मुलाचे हे वर्तन पाहून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

पोलिसांचा संशय खरा ठरला

रामसिंग आईला रुग्णालयात घेऊन जात असताना गाडीला आग लागली आणि त्यात सर्वांचा मृत्यू झाला, अशी माहिती कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांना दिली होती. पण, तपासात पोलिसांना यातमध्ये विसंगती आढळल्या. गाडीच्या पुढच्या सीटवर कोणीही बसले नव्हते, मृतांपैकी एक सुरग्यान यांच्या शरीरावर आग लागण्यापूर्वी चाकूने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या, यामुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. पोलिसांनी यानंतर तपास अपघाताकडून हत्येच्या दिशेने वळला. अखेर कसून चौकशी केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने आपला गुन्हा कबूल केला.

कुटुंबात मतभेद

​अजमेरचे पोलीस अधीक्षक हर्ष वर्धन यांनी प्रसारमाध्यमांना दिले्ल्या माहितीनुसार, ​रामसिंग चौधरी यांच्या दुसऱ्या लग्नामुळे कुटुंबात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. वडिलांकडून आपल्या आईला मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे मुलांच्या मनात वडिलांबद्दल तीव्र राग होता.
​रामसिंग अजमेरपासून ६० किलोमीटर दूर श्रीरामपुरा गावातील फार्महाऊसवर दोन पत्नी, आई आणि भाचीसोबत राहत होते.

मुलाने रचला हत्येचा कट

​या अल्पवयीन मुलाने पाच महिन्यांपासून हत्येचा कट रचला होता. तो गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीज आणि तासनतास ऑनलाईन गेम खेळायचा. सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना मुलाने रामसिंग यांच्या कानाजवळ चाकूने वार केले, त्यातच रामसिंग यांचा मृत्यू झाला. यावेळी रामसिंग यांची दुसरी पत्नी सुरग्यान जागी झाली. सुरग्यान यांनी आरडाओरडा सुरू केला. या आवाजामुळे रामसिंग यांची आई पुसी देवी आणि भाची महिमा खोलीत धावून आल्या.

आई – आत्याने दिली साथ

मुलाची आई (रामसिंग यांची पहिली पत्नी) आणि रामसिंग यांची बहीणही तिथे पोहोचल्या. या सर्वांनी मिळून सुरग्यान, पुसी देवी आणि महिमा यांची हत्या करून काटा काढला. चौघांची हत्या केल्यानंतर, ही घटना अपघात भासविण्यासाठी सर्व मृतदेह गाडीत ठेवून गाडीला आग लावून देण्यात आली. पण, पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीमुळे या धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.