राजस्थानच्या अजमेरमध्ये महिला कैद्यांना घरकामासाठी तुरुंगाबाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिला जेलरलाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या अजमेर सेंट्रल जेलमध्ये ती जेलर म्हणून कार्यरत होती, त्याच तुरुंगात आता तिला कैदी म्हणून ठेवण्यात आले आहे. ३७ वर्षीय दिव्या चौधरी या अजमेर सेंट्रल जेलमध्ये जेलर होत्या. त्यांचे पतीही जेलर असून त्यांची नियुक्ती कोटा येथे आहे. दिव्या अजमेरमध्ये आपल्या दोन लहान मुलींबरोबर भाड्याच्या घरात राहत होत्या. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

दोन महिला कैद्यांना घराबाहेर नेण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी दिव्या यांनी दोन महिला कैद्यांना तुरुंगाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली किरण उर्फ सेठा आणि न्यायालयीन कोठडीत असलेली सना यांचा समावेश होता. या दोघींना मुलींची देखभाल आणि घर साफ करण्याच्या कामासाठी नेण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

तुरुंगाच्या गेटवर कर्मचाऱ्यांचा विरोध

दिव्या चौधरी आणि त्यांची सहकारी महिला कॉन्स्टेबल सोनिया चौधरी या दोन्ही कैद्यांसह तुरुंगाच्या मुख्य गेटपर्यंत गेल्या. मात्र, तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी विरोध केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विरोध करूनही दोघींनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली.

‘मुलींची काळजी आणि घर साफ करण्यासाठी मदत हवी होती’

अजमेरचे डीएसपी शिवम जोशी यांच्या माहितीनुसार, दिव्या यांच्या दोन्ही मुली लहान आहेत. घर आणि कामातील वाढता ताण सांभाळण्यासाठी त्यांना मुलींची काळजी घेण्यासाठी तसेच घर साफ करण्यासाठी मदत हवी होती. तुरुंगाबाहेर गेल्यानंतर दोन्ही कैदी साधारण एक-दोन तासांत पुन्हा तुरुंगात परतल्या, असे पोलिसांनी सांगितले.

‘एफआयआर’नंतर जेलर फरार

अंतर्गत चौकशीत दिव्या चौधरी दोषी आढळल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी अजमेरच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘एफआयआर’ दाखल झाल्यानंतर दिव्या फरार झाल्या. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सायबर सेलच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला.

कोट्यातून अटक

६ ऑक्टोबर रोजी अजमेर पोलिसांच्या विशेष पथकाने कोटा जिल्ह्यातील एका फ्लॅटवर छापा टाकून दिव्या चौधरी यांना अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या आपल्या पतीच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये होत्या. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात आला.

६ ऑक्टोबर रोजी अजमेर पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत कोटा जिल्ह्यातील एका फ्लॅटवर छापा टाकला आणि दिव्या चौधरी यांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या आपल्या पतीच्या भाड्याच्या फ्लॅटवर राहात होत्या. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांचा ठावठिकाणा शोधून ही कारवाई करण्यात आली.

‘मला फक्त घरकामासाठी मदत हवी होती’

चौकशीदरम्यान, आपल्याला घर साफ करण्यासाठी मदतीची गरज होती, असा दावा दिव्या चौधरी यांनी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सोनियाला ओपन जेलमधील महिला कैद्यांना कामासाठी आणण्यास सांगितले होते, कारण अशा कैद्यांना सुरक्षेच्या नियमांनुसार बाहेर जाण्याची परवानगी असते. मात्र, सोनियाने ओपन जेलमधील कैद्यांऐवजी इतर दोन महिला कैद्यांना तेथे आणले, असा दावा दिव्या यांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ज्या तुरुंगाची सुरक्षा सांभाळली, तिथेच आता कैदी

राजस्थान कारागृह नियमांनुसार जेलरची जबाबदारी कैद्यांची कोठडी, सुरक्षा आणि शिस्त राखण्याची असते. या प्रकरणातील सर्वात वेगळा योगायोग म्हणजे, कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या दिव्या चौधरी यांनाच आता अजमेर सेंट्रल जेलमध्ये कैदी म्हणून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवम जोशी यांनी दिली.