महिलेच्या प्रसूतीदरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये भांडणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओतील एका डॉक्टरने या वादावर स्पष्टीकरण दिले. ‘भूलतज्ज्ञाने महिलेला इंजेक्शन देण्यास उशीर केला आणि यामुळेच माझा पारा चढला’ असे या डॉक्टरने म्हटले आहे.

राजस्थानमधील जोधपूर येथील उमेद रुग्णालयातील दोन डॉक्टरांमध्ये शस्त्रक्रिया सुरु असताना ऑपरेशन थिएटरमध्येच वाद झाला. सोशल मीडियावर डॉक्टरांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर रुग्णालय प्रशासनाने दोघांवरही निलंबनाची कारवाई केली. यातील डॉ़. अशोक नानिवाल यांनी ‘हिंदूस्तान टाईम्स’ या वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली आहे. नेमका वाद कशावरुन सुरु झाला याचा खुलासा नानिवाल यांनी केला.

स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. अशोक नानिवाल हे गेल्या पाच वर्षांपासून जोधपूरमधील उमेद रुग्णालयात कार्यरत आहेत. नानिवाल म्हणाले, अनिता नावाच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये आणण्यात आले. अनिता माझी पेशंट नव्हती. पण वेळेचे गांभीर्य ओळखून मी तिथेच थांबलो. तिच्यावर सिझेरियनची आवश्यकता होती. ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित भूलतज्ज्ञांनी रुग्णाला भूल देण्यास १५ ते २० मिनिटांचा विलंब केला आणि यामुळे माझा राग अनावर झाल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. रुग्णाची प्रकृती गंभीर होती आणि तिच्यावर शस्त्रक्रियेस विलंब होत होता असे त्यांनी सांगितले.

अशोक नानिवाल यांचा भूलतज्ज्ञ डॉ. मथुरालाल टाक यांच्याशी वाद झाला होता. व्हिडिओ डॉ. टाक यांच्या एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड केल्याचा दावा त्यांनी केला. तर डॉ. टाक यांनी या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांवर टीका होत होती. शस्त्रक्रिया सोडून डॉक्टर भांडू कसे शकतात असा सवाल उपस्थित होत होता. यात भर म्हणजे ज्या गर्भवती महिलेचे सिझेरियन झाले तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. राजस्थान हायकोर्टानेही याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.