Congress victory in Rajasthan बिहारमध्ये निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहे. एनडीए स्पष्ट बहुमताने आघाडीवर आहे. बिहारमध्ये काँग्रेसचाही सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. मात्र, राजस्थानच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. राजस्थानातील बारान जिल्ह्यातील अंता विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रमोद जैन भाया यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाचे मोरपाल सुमन आणि काँग्रेसचे बंडखोर नेते नरेश मीना यांचा पराभव केला आहे. काँग्रेससाठी या विजयाचा अर्थ काय? भाजपाच्या पराभवामुळे सत्ताधारी सरकारला कसा धक्का बसला? जाणून घेऊयात.
काँग्रेसचा उमेदवार विजयी
प्रमोद जैन भाया यांना ६९,४६२ मते मिळाली तर भाजपाचे सुमन यांना ५३,८६८ मते मिळाली. बंडखोर मीना यांना ५३,७४० मते मिळाली. अद्याप निवडणूक आयोगाने अंतिम आकडे जाहीर केलेले नाहीत. भाया यांना त्यांची स्थानिक राजकीय ताकद आणि प्रदीर्घ राजकीय कारकीर्द यांचा फायदा झाला. भाया तीन वेळा आमदार आणि कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. तसेच ते माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे मानले जातात. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी प्रचार करूनही, भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे नरेश मीना यांच्या हाती सलग तिसऱ्यांदा निराशा आली आहे. त्यांनी सलग तीन वर्षांपासून काँग्रेसविरुद्ध बंडखोरी केली आणि प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला.
भाजपासाठी या पराभवाचा अर्थ काय?
एकूण २०० जागांपैकी ही केवळ एकच विधानसभा जागा होती, तरीही या पराभवामुळे सत्ताधारी भजन लाल शर्मा सरकारला धक्का बसणार आहे. सरकारला आधीच राज्याच्या कारभारावर प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्य सचिव सुधांश पंत केंद्रामध्ये परतले, ज्यामुळे सरकारमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासाठीही ही पोटनिवडणूक काही प्रमाणात महत्त्वाची होती.
मागील अशोक गेहलोत सरकारच्या काळात (२०१८-२०२३), जेव्हा राजे बाजूला पडल्या होत्या, तेव्हा त्यांनी पोटनिवडणुकांच्या प्रचारापासून दूर राहणे पसंत केले होते आणि काँग्रेसने त्यापैकी बहुतेक जागा जिंकल्या होत्या. या पोटनिवडणुकीत मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार सुमन यांच्यासाठी प्रचार केला. विशेष म्हणजे, हा विधानसभा मतदारसंघ त्यांच्या प्रभावाच्या मूळ क्षेत्रापैकी एक आहे, जो झालावाड जिल्ह्याच्या आसपास आहे. या पराभवामुळे त्यांच्या विरोधकांना त्यांचा प्रभाव कमी होत असल्याची टीका करण्याची संधी मिळणार आहे.
काँग्रेससाठी या विजयाचा अर्थ काय?
या विजयामुळे काँग्रेसला शर्मा सरकारचा प्रभाव कमी असल्याचा मुद्दा मांडण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त, पक्षाच्या सुस्त पडलेल्या प्रदेश युनिटमध्ये उत्साह निर्माण होईल. भाया हे माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जात असल्याने, अशोक गेहलोत यांची प्रतिमा अधिक मजबूत होण्यासही या विजयाची मदत होईल. पक्षाने एकजूट दाखवली असली तरी, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन गट आकार घेत आहे आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा गेहलोत यांच्याबद्दलचा विरोध सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी याच वेळी, राज्यात पोटनिवडणूक झालेल्या सातपैकी पाच जागा भाजपाने जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त दौसाची जागा जिंकता आली होती.
बंडखोर नेत्यांसाठी या निकालाचा अर्थ काय?
अपक्ष उमेदवार नरेश मीना यांच्यासाठी ही निवडणूक कदाचित सर्वात महत्त्वाची होती. सलग तीन वर्षांत ही तिसरी वेळ आहे जेव्हा मीना यांनी बंडखोरी करून काँग्रेसच्या विजयाच्या शक्यता धोक्यात आणल्या आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बंडखोरी केली आणि बारान जिल्ह्यातील छबडा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि सुमारे ४४,००० मते मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी भाजपचे प्रताप सिंह सिंघवी यांना ६५,००० मते मिळाली होती, तर काँग्रेसचे करण सिंह यांना ५९,८९२ मते मिळाली होती.
२०२४ मध्ये, त्यांनी शेजारच्या टोंक जिल्ह्यातील देवली-उनियारा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे तिकीट मागितले, पण त्यांना पुन्हा नकार मिळाला. त्यावेळी भाजपाचे राजेंद्र गुर्जर १,००,५९९ मतांनी सहज जिंकले, तर मीना यांनी ५९,४७८ मते मिळवली आणि काँग्रेसचे कस्तूर चंद मीना यांना ३१,३८५ मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नरेश मीना यांचे समर्थक असा दावा करत आहेत की, काँग्रेसला त्यांच्या वाढीची भीती वाटत आहे आणि त्यामुळे त्यांना दूर ठेवले जात आहे. तर काँग्रेसचे नेते मीना यांच्या वादग्रस्त आणि अस्थिर स्वभावाचे कारण पुढे करतात. मीना हे वारंवार सार्वजनिक ठिकाणी वाद घालण्यासाठी, तसेच कथित मारहाणीसाठी ओळखले जातात.
अंता येथील पोटनिवडणूक
भाजपाचे आमदार कंवरलाल मीना यांना २० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात आयपीसी कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळ वापरणे), ५०६ (गुन्हेगारी धमकी), आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक (PDPP) कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लोकप्रतिनिधी (RP) कायदा, १९५१ अंतर्गत या मे महिन्यात अपात्र ठरवण्यात आले होते, त्यामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक होती. मीना हे माजी मुख्यमंत्री राजे यांच्या जवळचे मानले जातात.
२००५ मध्ये, झालावाडमधील मनोहर थाना येथे सरपंच निवडणुकीत पुन्हा मतदान घेण्याची मागणी करताना मीना यांनी तत्कालीन आरएएस अधिकारी राम निवास मेहता यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला होता. विधानसभेत भाजपाचे ११८ जागांचे बहुमत आहे आणि अंता येथील विजयामुळे काँग्रेसची संख्या ६७ पर्यंत वाढली आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत भारत आदिवासी पक्षाकडे चार, बहुजन समाज पक्षाकडे दोन, राष्ट्रीय लोक दलाकडे एक, तर आठ अपक्ष आमदार आहेत.
