राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा तेल शुद्धिकरण कारखान्याला सोमवारी आग लागली. या कारखान्याचे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार होते. कारखान्यापासून जवळच पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य पाहता उद्घाटन पुढे ढकलण्यात आले असून आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या ‘क्रूड डिस्टिलेशन युनिट’जवळ (सीडीयू) आगीला सुरुवात झाली. अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सोमवारी प्रकल्पाला भेट देणार होते, ती भेट रद्द करण्यात आली आहे.
हा प्रकल्प ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ आणि राजस्थान सरकारचा महत्त्वाकांक्षी संयुक्त उपक्रम आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने समाजमाध्यमावर एक पोस्ट लिहून प्रकल्पाचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. उद्घाटनाची नवी तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल, अशी माहिती मंत्रलायाने दिली.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य
‘एचपीसीएल’ आणि राजस्थान सरकारचा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी ७९ हजार ४५० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. ‘एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड’च्या (एचआरआरएल) या प्रकल्पात पेट्रोलियम, डिझेल आणि पॉलिप्रॉपिलीन, लिनिअर लो डेन्सिटी पॉलिथिलीन (एलएलपीडीई), हाय डेन्सिटी पॉलिथिलीन (एचडीपीई), बेन्झिन, टोल्यून आणि ब्युटाडाईन यासारखी पेट्रोकेमिकल पदार्थांचे उत्पादन केले जाणार आहे.
