राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी हे त्यांच्या वाचाळतेमुळे चर्चेत आले आहेत. खैरथल-तिजारा जिल्ह्यातल्या एका गावात भाजपाचे आमदार महंत बाबा बालकनाथ यांनी जातीवाचक वक्तव्य केलं. ज्यामुळे राजस्ताथ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांना माफी मागावी लागली.
नेमकी ही घटना काय घडली?
टपूकडा या भागात एका कार्यक्रमात आमदार महंत बाबा बालकनाथ एका कार्यक्रमात गेले होते. गोपाली चौक ते गांधी चौक या भागात इंटरलॉकिंग टाइल्स बसवण्याचं काम सुरु होतं त्याचा आढावाही बाबा बालकनाथ यांनी घेतला. त्यांनी रस्त्याचं आणि इंटरलॉकिंग टाइल्सचं काम पाहिलं तेव्हा त्यात अनियमितता होती. त्यांनी कनिष्ठ अभियंते छोटेलाल मीणा यांना फोन केला. तू अभियंता आहेस की काय न्हावी? असा सवाल केला तसंच तू बीटेक केलं आहे की अजून काही शिकलाय? असं म्हणत महंत बालकनाथ यांनी या अभियंत्याला झापलं. महंत बालकनाथ यांनी जे प्रश्न विचारले त्यात जातीवाचक शब्द वापरले गेल्याने हा वाद निर्माण झाला आहे. ज्यानंतर आता भाजपाचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना माफी का मागावी लागली?
महंत बालकनाथ यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सैनी तसंच माळी समाजातील सदस्यांनी बालकनाथ यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सार्वजनिक माफीची मागणी केली. नारायणी धाम महासभेचे प्रमुख विनोद कारेल म्हणाले, “आमच्या समाजातील ९० टक्के लोक भाजपाला मतदान करतात. पण भाजाप नेत्याने आमच्या स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे त्यांनी समाजाची सार्वजनिक माफी मागावी, ही आमची मागणी आहे. आम्ही काहीही मागत नाही, फक्त आमचा सन्मान मागत आहोत.” ज्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांना जाहीर माफी मागावी लागली.
मदन राठोड सैनी समाजाला उद्देशून काय म्हणाले?
तसंच कारेल यांच्यासह एक शिष्टमंडळही मदन राठोड यांना भेटलं आणि त्यांनी महंत बालकनाथ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली.
सैनी समुदायासह जी बैठक झाली त्यानंतर राठोड म्हणाले की मी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे तुम्हाला हे सांगतो आहे की जे वक्तव्य बालकनाथ यांनी केलं ते योग्य नव्हतं. तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी मी काळजी घेईन.
सोशल मीडियावर बालकनाथ यांचीही दिलगिरी
दरम्यान ज्यांच्या वक्तव्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला त्या महंत बालकनाथ यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून माफी मागितली. रस्त्याचं काम मला मुळीच आवडलं नाही. लोकांसाठी जेव्हा जी गोष्ट तयार केली जाते ती उत्कृष्ट दर्जाची असावी एवढंच मला म्हणायचं होतं. पण तरीही अनावधानाने माझ्याकडून ते शब्द गेले. मी असं बोलायला नको होतं. मी सैनी समाजाची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो असं बालकनाथ यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. मला तुमच्या पैकी कुणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, मी जे बोललो त्याचा मला पश्चात्ताप होतो आहे, माझी चूक झाली. जे वक्तव्य मी केलं त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. या आशयाची पोस्ट महंत बालकनाथ यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.
कोण आहेत महंत बालकनाथ?
महंत बालकनाथ यांचा जन्म राजास्थानातील अलवर जिल्ह्यातल्या कोहराना या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबात झाला.
भाजपाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. ही जागा त्यांनी जिंकली आणि ते आमदार झाले.
भाजपाच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक अशी महंत बालकनाथ यांची ओळख आहे.
महंत बालकनाथ हे योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे भगवे कपडे परिधान करतात. त्यामुळे राजस्थानमध्ये त्यांना योगी बालकनाथ असंही संबोधलं जातं.
वयाच्या सहाव्या वर्षी महंत खेतनाथ यांच्याकडे बालकनाथ यांनी अध्यात्माचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. महंत खेतनाथ यांनी बालकनाथ यांच्या लहानपणीच त्यांना गुरुमुख असं नाव दिलं होतं.
महंत खेतनाथ यांच्याकडून अध्यात्माचे धडे गिरवल्यानंतर ते महंत चंदनाथ यांच्याकडे आले. चंदनाथ यांनी त्यांची बालसुलभ वृत्ती पाहिली आणि त्यांना बालकनाथ हे नाव दिलं. ज्यानंतर त्यांना महंत बालकनाथ म्हटलं जाऊ लागलं.
