राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मदन राठोड यांनी अमेरिका आणि पाकिस्तानबाबत एक वक्तव्य केलं. ‘जर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तर आम्ही पाकिस्तानला साथ देऊ’, असं मदन राठोड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

मदन राठोड यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ आता विरोधकांकडून शेअर करण्यात आला असून त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने मदन राठोड यांच्या या वक्तव्याच्या संदर्भ देत भाजपावर हल्लाबोल केला आहे. राठोड यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मदन राठोड काय म्हणाले?

“आपल्या सर्वांना हे समजून घेणं गरजेचं आहे. आता भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर, जर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तर आम्ही पाकिस्तानच्या बाजूने राहू, कारण तो आपला शेजारी देश आहे. मात्र, जेव्हा प्रश्न आपल्या स्वतःच्या देशाचा येतो तेव्हा आपण आपल्या भारताच्या पाठीशी उभे राहतो. बरोबर ना? हेच आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे”, असं मदन राठोड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मदन राठोड यांच्या या वक्तव्यावरून आता भाजपा त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शामा मोहम्मद यांनी केला . त्या म्हणाल्या की, “पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे. जो आमच्या सैनिकांना आणि नागरिकांना मारतो. त्या देशाबद्दलचं भाजपाचं प्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे. राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड म्हणतात की जर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं तर ते पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतील. मग मोदी आणि अमित शाह हे सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने आहेत का? जर नसतील तर या देशविरोधी कृत्याबद्दल काय कारवाई केली जात आहे हे आम्हाला सांगावं”, असं त्यांनी म्हटलं आहे.

आम आदमी पार्टीने काय म्हटलं?

“जनता जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा त्यांना ‘पाकिस्तानी’ म्हटलं जातं. जेव्हा तरुण आवाज उठवतात तेव्हा त्यांना ‘दहशतवादी’ ठरवलं जातं. पण जेव्हा भाजपाचा नेता पाकिस्तानच्या बाजूने उभं राहण्याबद्दल बोलतो तेव्हा मोदीजींचा राष्ट्रवाद कुठे गायब होतो? पाकिस्तानच्या बाजूने उभं राहण्याबद्दल बोलणारा देशद्रोही आहे की नाही मोदीजी?”, असा सवाल करत आम आदमी पार्टीने भाजपावर टीका केली आहे.

मदन राठोड यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास पाकिस्तानला साथ देण्याच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “माझं विधान युद्धाच्या संदर्भात नव्हतं, तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या संदर्भात होतं”, असं म्हणत मदन राठोड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याचा काही सेकंदांचाच व्हिडीओ दाखवून गैरसमज पसरवण्यात आल्याचा दावाही राठोड यांनी केला.