राजस्थान भाजपाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ची चुकीची आवृत्ती वाजवल्याने वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी या प्रकाराबद्दल माफी मागत हा प्रकार तांत्रिक आणि मानवी चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट केले. भाजपाने जयपूरच्या बडी चौपार येथे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मदन राठोड यांनी मुख्य मंचावरून राष्ट्रध्वज फडकवला.
मूळ आवृत्तीऐवजी वेगळे संगीत
ध्वजारोहणानंतर ‘वंदे मातरम’ची मूळ आवृत्ती वाजवण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ध्वजारोहणानंतर साउंड सिस्टीमवर वेगळ्या संगीतासह ‘वंदे मातरम’ वाजू लागले. कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, आमदार बालमुकुंद आचार्य यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. आयोजकांनी तातडीने चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उपस्थितांनी या प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते.
मदन राठोड यांनी मागितली माफी
घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मदन राठोड यांनी या चुकीबद्दल माफी मागितली. त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या टीमकडून तांत्रिक आणि मानवी चूक झाली. अशी घटना घडायला नको होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस मुख्यालयातील ‘वंदे मातरम’वरूनही वाद
दरम्यान, दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’च्या सादरीकरणावेळी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हावभावावरूनही वाद निर्माण झाला. भाजपाने यावरून काँग्रेसवर टीका केली. मात्र, काँग्रेसने आरोप फेटाळत सोनिया गांधी गीताला विरोध करत नव्हत्या, तर बराच वेळ उभे असलेल्या खर्गे यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होत्या, असे स्पष्टीकरण दिले. पक्षाने त्या स्वतः ‘वंदे मातरम’ गात असल्याचेही स्पष्ट केले.
लाल किल्ल्यावर प्रथमच संपूर्ण ‘वंदे मातरम’
दरम्यान, यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ‘वंदे मातरम’शी संबंधित एक ऐतिहासिक कार्यक्रम लाल किल्ल्यावर झाला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात ‘वंदे मातरम’ची सर्व सहा कडवी सादर करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताचे सादरीकरण झाले. यंदाच्या सोहळ्यात ‘वंदे मातरम’च्या १५० वर्षांच्या वारशाला विशेष महत्त्व देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना या प्रसंगाचा उल्लेख केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’चे स्वर घुमत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘वंदे मातरम’च्या १५० वर्षांच्या प्रवासाच्या निमित्ताने हा प्रसंग अधिक विशेष असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
अशा पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गीताची चुकीची आवृत्ती वाजल्याने झालेल्या प्रकाराची चर्चा अधिकच रंगली.
