राजस्थानमधील अशोक गेहलोत मंत्रिमंडळाची फेररचना करण्याच्या दृष्टीने शनिवारी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. फेररचनेनंतर नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ रविवारी होण्याची शक्यता आहे, असे वृत्त पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. राजस्थान सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती काँग्रेसचे नेते प्रताप सिंह खचरियावास यांनी दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. तत्पूर्वी शुक्रवारी गोविंद सिंह दोतास्रा, हरीष चौधरी आणि रघु शर्मा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामे पाठविले होते. त्यानंतर शनिवारी गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राजस्थानचे प्रभारी अजय माकन आणि प्रदेशाध्यक्ष दोतास्रा यांनी किसान विजय सभेला संबोधित केले. त्यानंतर माकन आणि गेहलोत यांची एका हॉटेलमध्ये चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात सहभागी करण्याचा आग्रह धरला आहे. बसपमधून काँग्रेसमध्ये आलेले आमदार तसेच सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.