राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे. गेहलोत निष्ठावंतांनी राजस्थानमध्ये केलेल्या बंडानंतर दिल्लीतील या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध दर्शवत गेहलोत समर्थक ९० आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. याविरोधात काँग्रेसने गेहलोतांच्या तीन समर्थक नेत्यांना नोटीस बजावली आहे.
गांधी कुटुंबांवरील दवाबतंत्र अशोक गेहलोतांना भोवलं, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर?




या बंडासंदर्भात राजस्थानातील मंत्री शांती धारीवाल, महेश जोशी आणि धर्मेद्र राठोड यांना १० दिवसांमध्ये या नोटीसवर उत्तर देण्यास पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या बंडामुळे काँग्रेसची नाचक्की झाली असून गांधी कुटुंबियांची या कृतीवर नाराजी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर पडल्याचीदेखील चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अशोक गेहलोत आणि सोनिया गांधींची भेट महत्त्वाची ठरणार आहे.
मंगळवारी सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेत्या अंबिका सोनी आणि आनंद शर्मा यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजस्थानमध्ये निर्माण झालेले संकट थोपवण्याचे आदेश अशोक गेहलोत यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांचे नाव आघाडीवर होते. यासाठी सोनिया गांधी यांनी मल्लिरार्जुन खरगे आणि अजय माकन यांना काँग्रेसच्या आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी राजस्थानमध्ये पाठवले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री निवासस्थानावरील पूर्वनियोजित बैठकीला गेहलोत समर्थक आमदार फिरकले नाहीत.