scorecardresearch

गांधी कुटुंबावर टीका करताच ‘या’ बड्या नेत्याने कपिल सिब्बल यांना फटकारलं, म्हणाले “ज्या माणसाला काँग्रेसमधील ABC…”

काँग्रेसच्या पाच राज्यातील पराभवानंतर कपिल सिब्बल यांनी गांधी परिवारावरील आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवलीय.

kapil sibal
कपिल सिब्बल (फाईल फोटो)

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच पक्षनेतृत्वाबाबत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीनंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सिब्बल यांना फटकारलं आहे. काँग्रेस पक्षातील एबीसी माहिती नसलेल्या नेत्याने अशा प्रकारचे विधान करणे अपेक्षित नाही, असं अशोक गेहलोत यांनी म्हटंलय.

अशोक गेहलोत यांची कपिल सिब्बल यांच्यावर टीका

“कपिल सिब्बल एक प्रसिद्ध वकील असून ते काँग्रेसच्या संस्कृतीतून आलेले नाहीत. सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी त्यांना अनेकवेळा संधी दिलेली आहे. काँग्रेस पक्षाविषयी ज्या व्यक्तीला एबीसी माहिती नाहीये, अशा व्यक्तीने काँग्रेसविषयी विधाने करणे अपेक्षित नाहीये,” असं गेहलोत यांनी म्हटलंय.

कपील सिब्बल नेमकं काय म्हणाले होते ?

काँग्रेसच्या पाच राज्यातील पराभवानंतर कपिल सिब्बल यांनी गांधी परिवारावरील आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवलीय. “पक्षाचं नेतृत्व हे फार संकुचित विचार करत आहे. त्यांना मागील आठ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होतेय याची कारणं ठाऊक नाहीत. गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावं आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी,” असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.

दरम्यान, पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेच्या कार्यकारी समितीची बैठक रविवारी (१३ मार्च) पार पडली. या बैठकीत गांधी कुटुंबाने पक्षाच्या नेतृत्वापासून दूर व्हावे असे वाटत असेल तर आमची तयारी आहे, असे मत सोनिया गांधी यांनी मांडले होते. मात्र, बैठकीच्या शेवटी गांधी कुटुंबानेच पक्षाचे नेतृत्व करावे असा सूर उमटला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajasthan cm ashok gehlot criticizes kapil sibal over comments on sonia gandhi leadership and congress president prd

ताज्या बातम्या