राजस्थानमध्ये काँग्रेसच्या ९० आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली असल्याने सरकार संकटात आलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षनेतृत्वाला आपल्या हातात काहीच नसल्याचं म्हटलं आहे. ७१ वर्षीय अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत. यानिमित्ताने पहिल्यांदाचा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. अशोक गेहलोत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी नेतृत्वाची इच्छा आहे. यावरुनच राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालं असून, आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांनी काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी, “आमदार संतप्त असून, आपल्या हातात काहीच नाही” असं सांगितलं. वेणुगोपाल यांनी मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत नकार दिला आहे. “मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली नाही, किंवा त्यांनी मला फोन केला नाही. लवकरच तोडगा काढला जाईल,” असं वेणुगोपाल म्हणाले आहेत.

विश्लेषण : गेहलोत-पायलट संघर्षाचा नवा अंक : राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार?

आमदारांनी अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदी राहावेत किंवा त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीला हे पद देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यांनी सरकार कोसळलं तरी आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचं विधानसभा अध्यक्षांना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलट यांनी २०२० मध्ये गेहलोत यांच्याविरोधात पुकारलेल्या बंडाचाही उल्लेख केला आहे. सरकारला पाठिंबा देईल अशी व्यक्ती मुख्यमंत्रीपदी हवी, असं त्यांचं म्हणणं आहे.

अशोक गेहलोत राजस्थानमधून बाहेर पडल्यानंतर थोडा विरोध होईल याची काँग्रेसला अपेक्षा होती. पण हा विरोध इतका टोकापर्यंत जाईल याची मात्र त्यांनी कल्पना केली नसावी. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदारांची दिशाभूल करण्यात आली आहे. हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन मंत्र्यांना जयपूरला पाठवलं असून, प्रत्येक आमदाराशी स्वतंत्र चर्चा करण्यास सांगितलं आहे.