नातेवाईकाला Drink & Drive साठी दंड केल्याने काँग्रेस आमदाराचं पोलीस स्थानकात आंदोलन; म्हणे, “मुलं आहेत, थोडी प्यायली तर…”

आपल्या नात्यातील मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता तरी तो बरोबर कसा हे पटवण्याचा प्रयत्न काँग्रेस आमदाराकडून केला जात होता.

rajasthan congress mla meena kanwar
पोलीस स्थानकामध्ये महिला आमदार पतीसहीत पोहचली.

सोशल नेटवर्किंगवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील शेरगड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसच्या महिला आमदार मीना कंवर पोलीस स्थानकामध्ये जमीनीवर बसून आंदोलन करताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मीना यांच्या एका नातेवाईकावर वाहतूक पोलिसांनी दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई केली. याच कारवाईमुळे नाराज झालेल्या मीना यांनी रातानाडा पोलीस स्थानकामध्ये धरणे आंदोलन करत या कारवाईला विरोध केला. व्हिडीओमध्ये मीना यांचे पती उम्मेद सिंह चंपावतही त्यांच्यासोबत पोलीस स्थानकामध्ये बसून पोलीस कारवाईचा निषेध करताना दिसत आहेत.

पोलिसांनी जेव्हा मीना यांचा नातेवाईकांपैकी एक असणाऱ्या तरुणाला तपासासाठी रस्त्यात थांबवलं असता तो आपले राजकीय वजन किती आहे हे सांगू लागला. हा तरुण पोलिसांनाच परिणामांबद्दल सांगू लागल्यानंतर पोलिसांनी त्याला दंडाची पावती फाडण्यास सांगितलं. त्यानंतर या सर्व प्रकरणाची माहिती मीना कंवर यांना मिळाल्यानंतर त्या थेट पोलीस स्थानकात आल्या आणि केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जमीनवर बसून राहिल्या.

मीना यांनी आपल्या नात्यातील त्या मुलाने काही चुकीचं केलं आहे हे मान्य करण्यास तयार नव्हत्या. सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमदार मीना या दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या त्या तरुणाची बाजू मांडताना दिसत आहेत. “सर्वांचीच मुलं पितात. यात काही विशेष नाही. मुलं आहेत काय फरक पडतो जर त्यांना थोडीफार दारु प्यायली तर?”, असा प्रश्न त्या व्हिडीओत युक्तीवाद करताना विचारत आहेत. मी तुम्हाला त्याला सोडण्याची विनंती केली होती. मुलं आहेत, थोडी प्यायली तर काय झालं?, असं मीना व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

पोलीस स्थानकामध्येच या महिला आमदाराचा पती आणि पोलिसांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला. पोलीस स्थानकामध्ये येण्याआधी मीना यांच्या पतीने फोन करुन पोलिसांना धमकावल्याचंही सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये डीसीपींनी लक्ष घातल्यानंतर प्रकरण शांत झालं आणि मीना पोलीस स्थानकामधून घरी गेल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rajasthan congress mla meena kanwar sit on dharna inside jodhpur police station over drink and drive fine scsg

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या