Rajasthan Farmer Buries Cash Termites News : आपल्याकडील पैसे चोरीला जातील किंवा नाहक खर्च होतील, या भीतीने एका शेतकऱ्याने ते पैसे जमिनी खाली पुरले. पण जेव्हा पैशांची गरज भासली तेव्हा पैसे नेमके कुठे पुरले होते, हेच त्या शेतकऱ्याला आठवेना. अखेर, निसर्गाच्या चमत्काराने ते पैसे सापडले खरे, पण त्या पैशांची किंमत रद्दीएवढीच राहिली होती. राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यातील नेवाई गावात ही घटना घडली असून शेतकऱ्याचं तब्बल ५ लाखांचं नुकसान झालं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विसरभोळेपणा ठरला घातक
मांगीलाल मेघवाल असं या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी सुमारे एका वर्षापूर्वी पाचपद्रा येथील एक भूखंड विकला होता आणि त्यातून त्यांना ५ लाख रुपये मिळाले होते. मांगीलाल यांना या पैशांमधून त्यांच्या शेतजमिनीवर एक पक्के घर बांधायचे होते. रक्कम चोरीला जाऊ नये किंवा ती नाहक खर्च होऊ नये, म्हणून त्यांनी ते पैसे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरले, शेतात खड्डा खणला आणि त्यात पुरून ठेवले. मात्र, मांगीलाल यांना मद्यपानाची सवय आणि विसरभोळेपणामुळे आपण पैसे नेमके कुठे लपवले आहेत, याचा विसर पडला. जेव्हा त्यांना पैशांची गरज भासली, तेव्हा त्यांनी खूप शोध घेतला, पण त्यांना ती जागा आठवेना. हा शेतकरी त्यांच्या शेतजमिनीवरच एका तात्पुरत्या झोपडीवजा घरात आपल्या कुटुंबासह राहतो.
शोधाशोध केली तरीही पैसे सापडले नाहीत
पैसे शोधण्यात अपयश आल्यानंतर, शेवटी मांगीलाल यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला आणि मुलांना सांगितली. सुरुवातीला कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही, पण नंतर त्यांनी शेतातील वेगवेगळ्या जागा खणून पैसे शोधण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
पेरणी करताना आढळल्या नोटा, पण…
पैसे पुरल्याच्या घटनेला सुमारे एक वर्ष पूर्ण झालं होतं. पावसाळ्यानंतर कुटुंब शेतात पेरणीची तयारी करत होतं. एका रात्री, पैशांनी भरलेली ती प्लास्टिकची पिशवी जमिनीतून वर आली, परंतु अंधार असल्यामुळे रात्री कोणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मांगीलाल यांची पत्नी आणि मुलगा शेताच्या कुंपणाची दुरुस्ती करत असताना त्यांना ती पिशवी दिसली. त्यांनी पिशवी उघडताच त्यांना मोठा धक्का बसला. त्या पिशवीत ५०० रुपयांच्या नोटा होत्या, पण वाळवीने त्या पूर्णपणे कुरतडल्या होत्या आणि चलनी नोटांचे अक्षरशः तुकडे झाले होते.
काहीतरी नुकसान भरपाई मिळावी या आशेने, कुटुंबाने त्या खराब झालेल्या नोटा गोळा केल्या आणि पाचपद्रा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाव घेतली. परंतु, नोटांची अत्यंत दयनीय अवस्था पाहून बँकेने त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर हे कुटुंब बालोत्रा येथील मुख्य एसबीआय शाखेत गेले, पण तिथूनही त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं.
आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मांगीलाल यांनी जे पैसे जमिनीखाली गाडले होते, ते एका वर्षानंतर केवळ रद्दीचा तुकडा बनून बाहेर आले. एका विसरलेल्या जागेमुळे या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
