अपयशासमोर झुकला नाही, लिंबाची शेती करुन कमावतोय लाखो रुपये…वाचा राजस्थानच्या शेतकऱ्याची यशोगाथा

परिवाराकडूनही मिळतेय मोलाची साथ

शेती रॉकेट सायन्स नाहीये, कोणीही करु शकतं. फक्त तुम्हाला कधीतरी सुरुवात करावी लागते. काही कालावधीनंतर तुमची मुलही यात सहभागी होतात. शेतात काम करत असताना ते निसर्गाशी जोडले जातात. मेहनतीचं महत्व त्यांना समजतं. आपण खातो ते अन्न सहज तयार होत नाही याची जाणीव त्यांना होते, राजस्थानचा अभिषेक जैन आपल्या लिंबाच्या शेतीच्या यशोगाथेबद्दल माहिती देत होता. राजस्थानमधील संग्रामगढ भागात आपल्या दोन एकराच्या जमिनीवर २००७ सालापासून अभिषेक सेंद्रीय पद्धतीने लिंबू आणि पेरुचं उत्पन्न घेतो आहे.

बी.कॉमचं शिक्षण घेतल्यानंतर अभिषेकने पहिल्यांदा मार्बलच्या धंद्यात आपलं नशिब आजमावून पाहिलं. पण वडिलांच्या निधनानंतर अभिषकेला आपल्या शेतीकडे लक्ष द्यावं लागलं. २०१४ पर्यंत कशाचं पिक घ्यायचं हे मला माहिती नव्हतं. मी प्रयोग करायचो. एकदा मी डाळींबाची शेती करण्याचा प्रयत्न केला. परंतू रासायनिक खतांमुळे संपूर्ण पीक खराब झालं यानंतर मी सेंद्रीय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. खतांसाठी प्रामुख्याने शेणखत आणि जीवामृत वापरायचं ठरवलं आणि अनपेक्षितरित्या याचा चांगला फायदा मिळायला लागला. अभिषेक द बेटर इंडिया वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

लिंबू आणि पेरु यांच्या रोपाची लागवड केल्यानंतर शेणखत आणि नैसर्गिक खतांचा वापर केल्यामुळे अभिषेकला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. रासायनिक खतांवर खर्च होणारे २ ते ३ लाख रुपये वाचल्यामुळे लिंबाच्या शेतीमधून आणखी जोडधंदा करण्याचा विचार अभिषेकने केला. लिंबाचा रस काढण्यारासून ते त्याचं लोणचं तयार करण्यापर्यंतचं सर्व काम अभिषेक आणि त्याचा परिवार घरातच करायला लागला. सुरुवातीला घरी आलेल्या पाहुण्यांना चव घेण्यासाठी देण्यात आलेलं लिंबाचं लोणचं सर्वांना आवडायला लागलं. त्यामुळे अभिषेककडे लिंबाच्या लोणच्याची मागणी वाढायला लागली.

कालांतराने अभिषेकच्या या धंद्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की २०१६ सालात त्याने ५०० ते ७०० किलो लिंबाचं लोणचं विकलं. ९०० ग्रॅमच्या लोणच्याच्या बाटलणीसाठी अभिषेक २०० रुपये आकारतो. लिंब बाजारात विकून आणि लोणच्याच्या माध्यमातून अभिषेक जवळपास ६ लाखांचं उत्पन्न कमावतो. जी गोष्ट लिंबांची तीच पेरुची….खासगी कंपन्यांना कंत्राट दिल्यामुळे पेरुच्या शेतीमधूनही आपल्याला साडेतीन ते चार लाखांचा फायदा होत असल्याचं अभिषेक म्हणाला. अभिषेकचा परिवार आणि त्याची दोन मुलंही त्याला या कामात मदत करतात. लोणचं घरात तयार करण्यापासून ते त्याची पाकीट तयार करण्यापर्यंतचं कामही अभिषेकचा परिवार घरातच करतो. मनात जिद्द असली की शेतीच्या माध्यमातूनही चांगलं उत्पन्न घेता येतं हे सांगणारी अभिषेकची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajasthan farmer grows sweet success from lemons reaps healthy profits in 2 acres psd