बेरोजगारीला कंटाळून चार तरुणांची ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या

ते चौघेही नोकरी मिळत नसल्याने निराश होते. त्यांना शेती देखील जमत नव्हती. आपण ओझं म्हणून जगतोय, अशी भावना त्यांच्या मनात आली होती.

राजगड- रैनी या गावात राहणाऱ्या मनोज मीना (वय २४), सत्यनारायणन मीना (वय २२), रितूराज मीना (वय १७) आणि अभिषेक मीना (वय १८) या चौघांनी मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.

राजस्थानमध्ये चार तरुणांनी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नोकरी मिळत नसल्याने चौघेही निराश होते, असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या घटनेवरुन राजकारणही सुरु झाले असून काँग्रेसने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपाने देशातील तरुणांवर ही वेळ आणल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

अलवार जिल्ह्यातील राजगड- रैनी या गावात राहणाऱ्या मनोज मीना (वय २४), सत्यनारायणन मीना (वय २२), रितूराज मीना (वय १७) आणि अभिषेक मीना (वय १८) या चौघांनी मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. त्यांचे मित्र राहुल (वय १८) आणि संतोष (वय १९) हे देखील त्यांच्यासोबत होते. त्यांच्या डोळ्यादेखतच या चौघांनी ट्रेनसमोर उडी मारली. राहुल आणि संतोषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते चौघेही नोकरी मिळत नसल्याने निराश होते. त्यांना शेती देखील जमत नव्हती. आपण ओझं म्हणून जगतोय, अशी भावना त्यांच्या मनात आली होती. त्या चौघांनी संतोष आणि राहुलला देखील आत्महत्या करणार का असे विचारले. पण त्या दोघांनी नकार दिला.
‘आम्ही रेल्वे रुळालगत थांबलो होतो. मला भूक लागली होती. आपण घरी जाऊया असं मी त्यांना सांगितले. पण त्यांनी अर्धा तास थांबायला सांगितले. यानंतर चौघेही मोबाईलवरुन कुटुंबीयांना फोन करत होते. थोड्या वेळाने सत्यनारायणनने माझ्याकडे सिगारेट मागितली. सिगारेट ओढत असतानाच ट्रेन आली आणि चौघांनीही ट्रेनसमोर झोकून देत आत्महत्या केली’, असे राहुलने पोलिसांना सांगितले.

राहुल आणि संतोषच्या जबाबावरुन नोकरी नसल्याने ते चौघे हताश होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे दिसते. पण आम्ही या संपूर्ण घटनेचा सविस्तर तपास करत आहोत, असे अलवारमधील पोलीस अधीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

तर दुसरीकडे या घटनेवरुन राजकारणही सुरु झाले आहे. भाजपाने पाच वर्षात १० कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात ८. ५ लाख जणांनाच रोजगार मिळाला. केंद्र सरकारमुळेच तरुणांवर ही वेळ ओढावली, असे काँग्रेसने म्हटले आहे.

कुटुंबाची परिस्थिती चांगली
रितूराज हा कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होता. तर सत्यनारायणन आणि मनोज हे दोघेही पदवीधर होते. दोघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. तर अभिषेक विज्ञान शाखेतील प्रथम वर्षात नापास झाला होता. रितूराजचे वडील पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल आहेत. तर अभिषेकच्या वडिलांची दुधाची डेअरी आहे. सत्यनारायणनच्या कुटुंबीयांची शेती आहे. चौघांच्याही कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती इतकीही हलाखीची नाही. आत्महत्येमागे वेगळे कारणही असू शकते, अशी शक्यता एका पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajasthan four friends suicide jumped before train in alwar due to unemployment

ताज्या बातम्या