वडिलांचा मुलीवर बलात्कार; पीडित बहिणीची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर भावाची आत्महत्या

पीडितेने यापूर्वीही तिच्या वडिलांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे. मी झोपेत असायचे तेव्हा ते माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे असं या मुलीने म्हटलं आहे.

Rajasthan Girl Allegedly Raped By Father
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत (फोटो प्रातिनिधिक ट्विटरवरुन साभार)

राजस्थानमधील जालोरे जिल्ह्यामध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात या व्यक्तीचा मुलाला म्हणजेच पीडितेच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या काकूला सांगितला. तिने हा सारा प्रकार सांगतानाचा ऑडीओ शूट करण्यात आला. ही ऑडिओ क्लिप तिच्या भावाने ऐकली. त्यानंतरच त्याने आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. शनिवारी ही ३२ मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कुरु केला. मात्र त्याच दिवशी या मुलीच्या भावाने नर्मदा नदीच्या कालव्यात उडी मारुन जीव दिला. संचोरे परिसरामध्ये पीडितेच्या भावाने कालव्यात उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्या केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचल्याचं समजताच आरोपीने आपल्या राहत्या घरातून पळ काढला. पोलीस सध्या त्याच्या मागावर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पीडितेचा जबाब नोंदवण्यात आलाय.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये या मुलीने मोबाइल घेऊन देतो असं सांगून आपल्याला कारमध्ये नेलं आणि तिथे वडिलांनीच आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगते. मात्र बलात्काराची ही घटना कधी घडली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. तसेच या क्लिपमध्ये ही पीडित मुलगी त्या दिवशी तिच्या आईने हिच्या भावालाही सोबत घेऊन जा असं आरोपीला सांगितलं होतं मात्र त्याने नकार दिल्याचंही म्हटलं आहे. तसेच या ऑडिओमध्ये पीडितेने यापूर्वीही तिच्या वडिलांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे. मी झोपेत असायचे तेव्हा ते माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे असं या मुलीने म्हटलं आहे. माझे वडील मला एकटीला कधी बाहेर जाऊ द्यायचे नाही तसेच ते कुटुंबातील इतर व्यक्तींशी मला बोलूही द्यायचे नाहीत असंही या मुलीने म्हटलं आहे.

वडिलांच्या या वागण्याला कंटाळून एकदा आपण त्यांना विरोध करताना त्यांच्यावर ओरडल्यानंतर आईने आपल्यालाच दम भरल्याची आठवणही या मुलीने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलीय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मुलीचा जबाब नोंदवण्याबरोबरच आईचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे. मात्र मुलीवर बापानेच बलात्कार केल्याचं समोर आल्यानंतर मुलाने आत्महत्या केल्याचं वृत्त जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखं पसरलं असून या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajasthan girl allegedly raped by father brother dies by suicide police scsg