स्वयंघोषित गुरु आसाराम बापूची जन्मठेपेची शिक्षा राजस्थान उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. आसाराम बापूसाठी हा मोठा झटका मानला जातो आहे. २०१३ मध्ये आसाराम बापूने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या मुलीने आवाज उठवल्यानंतर आसाराम बापूला अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
२०१८ मध्ये विशेष बाल न्यायालयाने काय निर्णय दिला होता?
आसाराम बापूच्या विरोधात कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जोधपूरच्या विशेष बाल न्यायालयाने आसारामला एप्रिल २०१८ मध्ये IPC कलम ३७६ (फ), कलम ३७६ (ड) सामूहिक बलात्कार, ३७० (४) मानवी तस्करी, ५०६ धमकी देणं, १२० ब गुन्ह्याचा कट रचणं या आरोपांखाली दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. या निर्णयाविरोधात आसारामाने राजस्थानच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याला कुठलाही दिलासा दिलेला नाही. उच्च न्यायालयाने सामूहिक बलात्कार आणि कट रचणं या दोन गुन्ह्यांमधून त्याला दिलासा दिला आहे. मात्र जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे आणि आसारामने तातडीने तुरुंगात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील आसारामचे सहआरोपी शरद आणि शिल्पी यांची तुरुंगातून सुटका केली आहे. या दोघांवर पीडितेची भेट आसारामची घालून दिल्याचा आणि कट रचल्याचा आरोप होता.

राजस्थान उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे?
आसाराम बापूची जन्मठेप कायम ठेवताना न्यायालयाने हे म्हटलं आहे की भारतीय न्याय संहितेनुसार बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचे आसारामवर झालेले आरोप हे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्याला जामीन मिळण्याचा किंवा शिक्षेतून सूट मिळण्याचा प्रश्नच येत नाही. त्याची जन्मठेप कायम ठेवली जाते आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने कुठले मुद्दे निर्णयात मांडले?
१) आसाराम बापूला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कायम राहणार आहे. त्याला दिलासा देण्याचा प्रश्नच येत नाही असा निर्णय जस्टिस योगेंद्र कुमार आणि जस्टिस अरुण मोंगा यांनी दिला.
२) आसारामवर IPC 1860 च्या ३७६ ड च्या अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा आहे त्यातून त्याला आम्ही दोषमुक्त करत आहोत. कारण जे पुरावे सादर झाले आहेत ते सामूहिक बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत.
३) आसाराम बापूने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिचं लैंगिक शोषण केलं हे पुराव्यांवरुन सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याची जन्मठेप आम्ही कायम ठेवत आहोत.
४) आसाराम बापूने तुरुंगात हजर व्हावं. सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे. मात्र त्याला आम्ही तुरुंगात परतण्याचे आदेश देत आहोत.
५) शिल्पी आणि शरद या दोघांच्या याचिकेवरही आम्ही निर्णय देत आहोत. विशेष न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवलं होतं. आम्ही या दोघांबाबत समोर आलेले पुरावे आणि साक्षी यावरुन हा निर्णय घेतला आहे की यांची सुटका केली जावी.
स्वयंघोषित गुरु आहे आसाराम बापू
बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू हा लोकप्रिय धर्मगुरू होता. १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर त्याने पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं. त्यांच्या आश्रमाच्या विविध उत्पादनांना आणि अध्यात्मिक साहित्यांना देशभरात प्रचंड मागणी होती. त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात होती. राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते. आसाराम बापूची लोकप्रियता शिखरावर असताना त्यांच्यासोबत दिसलेल्या काही राजकीय नेत्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय यांचा समावेश आहे.

२०१३ मध्ये नेमकं काय घडलं?
२०१३ मध्ये खऱ्या अर्थाने आसाराम बापूच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. जोधपूर आणि गांधीनगर येथे त्यांच्यावर बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले. पीडितेच्या आई वडिलांवर आसारामने दबाव टाकण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांना धमक्याही दिल्या. मात्र ते ठाम राहिले. त्यामुळेच आसारामला तुरुंगात जावं लागलं. तसंच आसाराम पाठोपाठ त्याचा मुलगा नारायण साई याच्यावरही बलात्काराचे काही गुन्हे दाखल झाले. संबंधित सर्व गुन्ह्यांतील अनेक साक्षीदार मृत अवस्थेत आढळले. २०१४ मध्ये अमृत प्रजापती यांना राजकोटमध्ये गोळ्या घालून ठार मारले होते. ही हत्या आसाराम बापूच्या एका अनुयायाने केल्याचं समोर आलं होतं. संबंधित दोन बलात्काराच्या गुन्ह्यात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आता ही शिक्षा राजस्थान उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे आणि आसारामला तुरुंगात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.
आसारामच्या शिष्यांची मागणी आता काय?
राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम बापूची जन्मठेप कायम ठेवली आहे. त्यामुळे आता आसारामने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी असं आसरामच्या शिष्यांनी म्हटलं आहे. आता असा निर्णय आसाराम घेणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
