राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांची पत्नी आयपीएस प्रशाखा माथूर हे दाम्पत्य वादात सापडले आहेत. या सनदी अधिकारी दाम्पत्याने तब्बल ४० लक्झरी व्हिला व कॉटेजेस खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व लक्झरी व्हिला या दाम्पत्याने एकाच कंपनीकडून अवघ्या अडीच वर्षांत खरेदी केल्याचा आरोप आहे.

४० व्हिला खरेदी केल्यानंतर आयएएस शिखर अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रकरणात आता राजस्थान सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आयएएस शिखर अग्रवाल यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्या असून त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

राजस्थान सरकारने बुधवारी शिखर अग्रवाल यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत (APO) ठेवलं आहे. शिखर अग्रवाल हे १९९३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तसेच अग्रवाल यांनी याआधी उद्योग, एमएसएमई, नियोजन आणि इतर विभागांमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. याव्यतिरिक्त ते राजस्थान राज्य औद्योगिक विकास आणि गुंतवणूक महामंडळाचे अध्यक्ष आणि ‘राजसिको’चे (RAJSICO) व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहत होते.

शिखर अग्रवाल यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नसल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेले अग्रवाल हे यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते. तसेच माजी मुख्य सचिव सुधांश पंत यांच्याबरोबर मतभेद झाल्याच्या वृत्तानंतर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून हटवण्यात आलं होतं.

दरम्यान, एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून खरेदी केलेले लक्झरी व्हिला व कॉटेजेस पुन्हा त्यांच कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याचाही आरोप अग्रवाल यांच्यावर आहे. या माध्यमातून ते ५ लाख प्रति व्हिला अशा दराने ते भाडे घेत होते असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.