पीटीआय, जयपूर

राजस्थानच्या झुनझुनू जिल्ह्याच्या छापोली गावामध्ये सोमवारी आठ मजुरांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू असताना यंत्राचा विद्युत तारांशी संपर्क झाल्याने ही दुर्घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय अन्य पाच जण भाजून जखमी झाले.

छापोली येथे छापोली ते कडमकुंड या अरुंद रस्त्याचे काम सुरू आहे. उदयपूरवटीच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रामपाल यांनी सांगितले की, सिमेंट खडी मिश्रणासाठी वापरले जाणारे यंत्र डोक्यावरून जाणाऱ्या उच्च-प्रभारी विद्युत तारेच्या संपर्कात आले. त्यामुळे यंत्रातून विद्युत प्रवाहाचे वहन झाले आणि मजुरांना विजेचा धक्का बसला. हरिराम गुर्जर, मंगलचंद गुर्जर, कालुराम गुर्जर, पवन गुर्जर, विष्णू सैनी, सुरेश सैनी, मुकेश सैनी आणि फतेहचंद सैनी अशी मृतांची नावे आहेत. मृत मजुरांचा वयोगट २० ते ३८ इतका आहे. जखमी झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पाचही जखमींवर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.