जयपूर : राजस्थानातील ३०९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) विरोधी पक्ष काँग्रेसवर स्पष्ट आघाडी घेतली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत जाहीर झालेल्या १०,२१० प्रभागांच्या निकालांपैकी भाजपने ४,१७१ प्रभागांमध्ये विजय मिळवला असून काँग्रेसने ३,५९७ जागांवर बाजी मारली आहे. राज्यभरात २,२७२ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाल्यामुळे अनेक पालिकांमध्ये सत्तास्थापनेची किल्ली अपक्षांच्या हाती आली असून ते निर्णायक भूमिकेत आले आहेत.

राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निकालांत संमिश्र चित्र पाहायला मिळाले. उदयपूरच्या ८० सदस्यांच्या महापालिकेत भाजपने ५३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. भीलवाड्यात ७० पैकी ४५ आणि कोटा महापालिकेत १०० पैकी ५३ प्रभाग भाजपने जिंकले. या निवडणुका मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारसाठी तसेच काँग्रेससाठी २०२८च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीची महत्त्वाची राजकीय चाचणी मानली जात आहे.

काँग्रेसची आघाडी कुठे?

बीकानेरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली असून अजमेर आणि पालीमध्येही काँग्रेस आघाडीवर होती. जयपूर आणि अलवरमध्ये भाजपने काँग्रेसला मागे टाकले. जोधपूरमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर झाली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ४४ प्रभाग जिंकले असून १० प्रभागांत अपक्ष विजयी झाले.

३०९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान

राज्यातील ३०९ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले. १० महापालिका, ५१ नगर परिषद आणि २४८ नगरपालिकांमध्ये एकूण १० हजार २४५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी १ कोटी ४४ लाखांहून अधिक मतदार पात्र होते.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात अपक्षांचे वर्चस्व

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे शहर असलेल्या भारतपूरमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे. येथील ६५ पैकी ३६ प्रभागांत अपक्षांनी विजय मिळवला किंवा आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भाजपला केवळ २० आणि काँग्रेसला ७ जागांवर समाधानी राहावे लागले. येथे बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.