राजस्थानमधील अलवार येथे मंगळवारी पहाटे पाच वाजून १० मिनिटांच्या सुमारास मध्यम आकाराची उल्का पडल्याने एकच गोंधळ उडाला. येथील एका कारखान्याच्या आवारामध्ये ही उल्का पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पहाटेच्यावेळी अचानक भरपूर प्रकाश पडल्याचे या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही उल्का आकाराने इतकी मोठी होती त्यामुळे २० फूट खोल खड्डा पडल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

अलवार येथील इतारना औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही उल्का पडली. अचानक परिसरामध्ये भरपूर प्रकाश पडल्याने स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. माथ्र सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर उल्का पडल्याचे लक्षात आले. पृथ्वीवर रोज अनेक उल्का पडत असतात. मात्र आकार लहान असल्याने अनेकदा असा उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळून खाक होतात. मात्र राजस्थानमध्ये घडलेला प्रकार यापेक्षा वेगळा होता. उल्का आकाराने मोठी असल्याने ती जळून खाक झाली नाही. सुदैवाने औद्योगिक वसाहतीमध्ये ही उल्का पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

पोलिसांनी उल्कापात झालेल्या भागामध्ये प्रवेशबंदी लागू केली आहे. खगोल शास्त्रज्ञांना यासंदर्भात महिती देण्यात आली असून बुधवारी या ठिकाणी येऊन खगोल शास्त्रज्ञ तपास करणार असल्याचे समजते.

अशाप्रकारे राजस्थानमध्ये उल्का पडण्याची पहिलीच वेळ नसून याआधी २०१९ साली जुलै महिन्यात नांगला कासोटा गावातही उल्का पडली होती.