राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात बेकायदा खनन रोखण्यासाठी गेलेले ४० वर्षीय वन अधिकारी प्रताप सिंह चुंडावत यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाला जंगल परिसरात बेकायदा माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर डंपरचालक पळून जाऊ लागला. चुंडावत यांनी मोटारसायकलवरून त्याचा पाठलाग केला. याचदरम्यान डंपरने त्यांना चिरडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हत्येसह बेकायदा खननाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेबाबत सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
बेकायदा खननाची माहिती मिळताच पथक घटनास्थळी
ही घटना सोमवारी मध्यरात्री प्रतापगड जिल्ह्यातील छोटीसादडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, घाटीवाले बालाजी मंदिराजवळील जंगल परिसरात घडली. वन विभागाच्या पथकाला या भागात बेकायदा माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली. वनरक्षक प्रताप सिंह चुंडावत यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांना जेसीबी आणि डंपरच्या मदतीने माती उत्खनन सुरू असल्याचे दिसले. वन विभागाचे पथक पाहताच डंपरचालक तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोटारसायकलवरून डंपरचा पाठलाग
डंपरला तसाच सोडून न देता चुंडावत यांनी आपल्या रॉयल एन्फिल्ड मोटारसायकलवरून त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, याचवेळी बेकायदा खननात सहभागी असलेले काही अन्य आरोपी डंपरच्या जवळ पोहोचले.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, या लोकांनी डंपरचालकाला “याच्या अंगावर चढव” असे म्हणत वाहन चुंडावत यांच्या अंगावर चढवण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर डंपरचालकाने चुंडावत यांना धडक देऊन चिरडल्याचा आरोप असून चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी पसार झालेल्या डंपरचालकाची ओळख काना बावरी अशी पटवली असून, या संपूर्ण प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध घेतला जात आहे.
उपचारादरम्यान वन अधिकाऱ्याचा मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या चुंडावत यांना तातडीने उपचारासाठी निंबाहेडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जेसीबी आणि डंपर जप्त, काही जण ताब्यात
प्रतापगड पोलिसांनी या प्रकरणात हत्येसह सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, वनजमिनीवरून चोरी, बेकायदा खनन अशा विविध आरोपांखाली एफआयआर दाखल केली आहे. घटनास्थळावरून जेसीबी आणि डंपर जप्त करण्यात आले आहेत. जेसीबी मशीनचा मालक आणि चालकासह काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वन विभागाचे पथक सुरुवातीला घटनास्थळी पोहोचले तेव्हा सुमारे पाच ते सहा जण बेकायदा उत्खनन करत होते. चुंडावत यांच्यासोबत वनरक्षक सुरेश आणि अजय हेही होते.
कोण होते प्रताप सिंह चुंडावत?
प्रताप सिंह चुंडावत हे प्रतापगड जिल्ह्यात सुमारे दोन वर्षांपासून कार्यरत होते. वन विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचे वर्णन अत्यंत कार्यक्षम आणि बहुआयामी अधिकारी म्हणून केले आहे. त्यांनी बिबट्या आणि अजगारांसह वन्यजीवांच्या बचावकार्यात सहभाग घेतला होता. तसेच नर्सरी आणि वृक्षलागवडीच्या कामातही त्यांचे योगदान होते. पोहणे आणि शूटिंगसारख्या खेळांमध्येही ते सक्रिय होते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यंदा त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. यापूर्वी त्यांना जिल्हा आणि विभागीय पातळीवरही अनेक पुरस्कार मिळाले होते.
पर्यावरण संवर्धनासाठी काही महिन्यांपूर्वीच सन्मान
५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाला जयपूरमध्ये राजस्थान पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धन केंद्रातर्फे चुंडावत यांचा वन आणि वन्यजीव संवर्धनातील योगदानासाठी सन्मान करण्यात आला होता. वन्यजीव बचाव, पर्यावरण संरक्षण, वन अतिक्रमण हटवणे आणि जंगलाचे संरक्षण यासाठी त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली होती.
दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शहीद दर्जा देण्याची मागणी केली आहे. वन विभागाकडूनही यासंदर्भात सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर राजस्थानमध्ये बेकायदा खनन रोखण्यासाठी काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रतापगडचे पोलिस अधीक्षक विशाल जांगिड यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
