राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यामुळे ते राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी राजस्थान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. अशोक गेहलोत यांच्यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे अशोक गेहलोत समर्थक आमदार नाराज झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना निरीक्षक आणि प्रभारी म्हणून पाठवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह दोन्ही निरीक्षक हॉटेलमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. विधीमंडळ पक्षाची बैठक काही वेळात सुरू होऊ शकते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह २५ आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.

हेही वाचा- “आपण आत्महत्या करायची नाही, पण…” भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान

गेहलोत यांना पाठिंबा देणारे आमदार राजीनामा देऊ शकतात
इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत गटाचे सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जाऊ शकतात. गेहलोत समर्थक आमदार सामूहिक राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. सुमारे ८० आमदारांनी त्यांचे राजीनामे लिहिले असून ते सर्व सभापतींच्या घरी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काँग्रेस नेते प्रताप सिंग खाचरियावास यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितलं की, सर्व आमदार संतापले असून ते राजीनामा देणार आहेत. आम्ही विधानसभा सभापतीच्या घरी जात आहोत. कोणतीही चर्चा न करता मुख्यमंत्री अशोक गेहलोत स्वत: निर्णय कसे काय घेऊ शकतात, यामुळे सर्व आमदार नाराज आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan political developments 80 mla of ashok gehalot supporters will resign rmm
First published on: 25-09-2022 at 21:30 IST