राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकाने हॉटेलमालकांना विकल्याची आणि त्यानंतर हॉटेलमध्ये तब्बल ३० नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

नेमकी घटना काय?

पोलीसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, एका स्थानिक रिक्षाचालकाने या चिमुरडीचे अपहरण करून तिला शहरातील काही हॉटेल चालकांना विकले होते. या हॉटेल्समध्ये तब्बल ३० जणांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. दिवसाढवळ्याही तिच्यावर बलात्कार करण्यात येत होता. अत्याचारादरम्यान पीडित मुलगी वेदनेने ओरडू नये किंवा तिने कोणाला काही सांगू नये, म्हणून तिला जबरदस्तीने दारू पाजली जात होती, असा खळबळजनक आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

जनतेचा आक्रोश आणि निषेध मोर्चा

हा भयानक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण श्रीगंगानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पीडितेला न्याय मिळावा आणि सर्व दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शहरात एक मूक मोर्चाही काढण्यात आला. नागरिकांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांविरोधात तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

राजकारण तापले; काँग्रेसचे धरणे आंदोलन

या घटनेवरून राजस्थानमधील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने गंगनगरी ट्रेडर्स असोसिएशनच्या इमारतीबाहेर तीव्र निदर्शने केली. करणपूरचे काँग्रेस आमदार रुपिंदर सिंह कुन्नर, जिल्हा प्रभारी झिया उर रहमान आणि इतर अनेक नेत्यांनी रविवारी घटनास्थळी धरणे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस आणि हॉटेल चालकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार कुन्नर यांनी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या अपयशावर कडाडून टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये मुख्य आरोपी रिक्षाचालक, संबंधित हॉटेल चालक आणि अत्याचार करणाऱ्या ३० जणांवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.आणि या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात निष्पक्ष तपास व्हावा.

काँग्रेस नेत्यांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने यावर लवकरच ठोस पावले उचलली नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून काही संशयितांची चौकशी सुरू आहे.