भारतीय सैन्यदलातील एका महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय सैन्यदलात २०१३ पासून कार्यरत असलेली ही २६ वर्षीय महिला राजस्थानमधील अलवरमध्ये कार्यरत आहे. ‘नारी शक्ती’च्या प्रदर्शनासाठी प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्येही या महिलेने भाग घेतला होता. दोन महिन्यांपूर्वी तक्रार नोंदविण्यात आलेल्या या प्रकरणाबाबत तिच्या वडिलांनी आता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना पत्र लिहिले आहे. आपल्या मुलीचे तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कारवाई करण्याच्या नावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्यास युनिट सोडण्याआधी चांगली पोस्टिंग दिली. माझ्या मुलीची प्रतिमा डागाळण्याचा निश्चय वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. माझी मुलगी आपली बाजू सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचेदेखील त्यांनी पत्रात म्हटले आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या अंतर्गत समितीकडे आपल्या मुलीची तक्रार आल्याने याची सुनावणी योग्य प्रकारे होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या महिन्याच्या सुरुवातीला समितीची बैठक झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्याविरूद्ध योग्य ती कारवाई करण्याचे संकेत समितीने दिले. भारतीय सैन्यदलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, योग्य ती कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.