Rajdhani Express Theft Case Railway Passenger Compensation: ट्रेनमध्ये सामान चोरीला जाणे नित्याच्या घटना वाटत असल्या तरी प्रवाशांना याविरोधात आवाज उचलता येतो. प्रवाशांनी स्वतःच्या सामानाची काळजी स्वतः घ्यावी, असे सांगितले जात असले तरी प्रवाशांनी जर सामान चोरी झाल्यावर योग्यरितीने तक्रार नोंदवली तर त्यांना त्यांच्या सामानाची भरपाई मिळू शकते. पंजाबमधील एका ग्राहक आयोगाने यासंबंधीचा महत्त्वाचा निकाल दिला आहे. राजधानी एक्सप्रेसमधील ३एसी डब्यातून प्रवास करताना एका दाम्पत्याचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असलेली हँडबॅग चोरीला गेली. या प्रकरणाचा निकाल नुकताच दिला गेला असून दाम्पत्याला रेल्वेकडून भरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले.

ग्राहक आयोगाचे अध्यक्ष कुलविंदर सिंग पन्नू आणि सदस्य राज कुमार शुक्ला यांनी रेल्वेच्या सेवेतील त्रुटी दाखवून देत नुकसान भरपाई मंजूर केली. ३० जून रोजी या प्रकरणाचा आदेश देण्यात आला.

आरपीएफकडे सदर प्रवाशाने तातडीने केलेली तक्रार, रेल्वेने घेतलेली परस्परविरोधी भूमिका, कोच अटेंडंटची डब्यातील अनुपस्थिती आणि रेल्वेकडे असलेले महत्त्वाचे रेकॉर्ड सादर करण्यात आलेले अपयश या सर्व बाबींवरून रेल्वेने प्रवाशांना योग्य सेवा दिलेली नाही, हे स्पष्ट होते, असे आयोगाने निकालात म्हटले.

चोरी कशी झाली?

प्रवाशाने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ डिसेंबर २०२१ रोजी सदर दाम्पत्य आपल्या मुलाबरोबर दिब्रुगढ-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यांनी ३एसी डब्यात तीन सीट आरक्षित केल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांची हँडबॅग चोरीला गेली. या बॅगेत सुमारे ६५,००० रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ५,००० रुपये रोख आणि बँक पासबुक होते.

चोरी झाल्यानंतर दाम्पत्याने लगेचच कोच अटेंडंटचा शोध घेतला. मात्र तो तिथे उपस्थित नव्हता. यानंतर त्यांनी रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणीस यांना याची माहिती दिली. नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर या प्रकरणी झिरो एफआयआर नोंदवण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडून सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा आणि अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब झाल्याचा आरोप करत दाम्पत्याने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.

दुसरीकडे, रेल्वेने हे आरोप फेटाळून लावले. संबंधित स्टेशनवरील ऑन-ड्युटी स्टेशन मास्टरला या घटनेची कोणतीही माहिती नव्हती, असा दावा रेल्वेने केला. तसेच सेवेतील त्रुटीचा आरोप फेटाळत ही तक्रार रद्द करण्याची मागणी केली.

दाम्पत्याला दिलासा

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आयोगाला असे आढळून आले की, रेल्वेने सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांच्याच भूमिकेला छेद मिळाला. रेल्वेच्या अंतर्गत रेकॉर्डमधून हे स्पष्ट झाले की, प्रवाशांनी चोरीची तक्रार केल्यानंतर प्रवासादरम्यान आरपीएफच्या पथकाने त्यांची भेट घेतली होती. नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर एफआयआर दाखल करणार असल्याचे प्रवाशांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते.

आयोगाने दिलेल्या आदेशात म्हटले की, जेव्हा रेल्वे मान्य करते की, त्यांच्या आरपीएफ पथकाला तक्रार मिळाली होती. तेव्हा रेल्वे प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती, असा दावा करता येत नाही. तसेच प्रवाशांनी नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर एफआयआर नोंदवल्याचेही स्पष्ट आहे.

तसेच चोरीच्या वेळी कोच अटेंडेंट उपस्थित नसल्याचा दाम्पत्याचा आरोप रेल्वेला खोडून काढता आला नाही. अटेंडंट ड्युटीवर असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याचे ड्युटी रोस्टर किंवा इतर कोणतेही रेकॉर्ड सादर करण्यात रेल्वे अपयशी ठरली. रेल्वेने महत्त्वाची माहिती दडवून ठेवली. ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष निघत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

८० हजार रुपयांची मिळाली भरपाई

सर्व पुराव्यांची तपासमी केल्यानंतर आयोगाने तक्रार मान्य केली आणि उत्तर रेल्वेने संबंधित दाम्पत्याला ७० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रवाशाला झालेला मानसिक छळ आणि मनस्तापापोटी अतिरिक्त १० हजार रुपये देण्याचेही आदेश दिले.