Rajendra Dadabi Nepal School Save Kids : नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर पुरात असंख्य जण वाहून गेले आहेत. अनेकजण अद्यापही बेपत्ता आहेत. गावच्या गावं उद्ध्वस्त झाली असून तेथील घरं नामशेष झाली आहेत. त्रिशुली नदीला आलेल्या पुरात नुवाकोटमधील त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळाही या पुरात वाहून गेली. पण या शाळेतील तब्बल १६४३ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यात शाळेच्या मुख्यध्यापकांना यश आलंय. या संदर्भात दि टाइम्सने वृत्त दिलंय.

शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दावादी यांना त्यांच्या एका मित्राने महापुराची माहिती दिली. “तो म्हणाला की गाव वाहून गेलंय: नदीने ते गिळंकृत केलंय. त्याने मला पळून जायला सांगितलं.” नेपाळच्या त्रिशुली खोऱ्यातील ‘त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयाचे’ मुख्याध्यापक राजेंद्र दावाडी यांना बुधवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी त्यांच्या एका मित्राकडून हा इशारा मिळाला. हिमनदी (ग्लेशियर) फुटल्यामुळे आलेल्या पुराचा प्रवाह डोंगराळ नदी प्रणालीतून वेगाने पुढे सरकत असताना, त्यांच्या शाळेत आणि आसपास १,६४३ मुले उपस्थित होती. या पुरामुळे नेपाळमध्ये ७३४ आणि तिबेटमध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला. खडक, बर्फ, चिखल आणि ढिगाऱ्यांचे लोंढे या भागात वेगाने पसरल्याने इमारती, पूल आणि वीज केंद्रे वाहून गेली.

आधी वाटलं शाळा सुरक्षित

ताज्या आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये सुमारे २,४९८ लोक अजूनही बेपत्ता आहेत, तर तिबेटच्या जिरॉन्ग काउंटीमध्ये आणखी ५४६ लोक बेपत्ता आहेत. पुराचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने, ४७ वर्षांचे इंग्रजी शिक्षक असलेल्या दावाडी यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा वेळ होता. त्या दिवशी सकाळी पूरग्रस्त नुवाकोटमधील शाळेतील मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि मुलांची सुरक्षा आता त्यांच्या निर्णयावर अवलंबून होती. सुरुवातीला दावाडी यांना वाटलं की शाळा सुरक्षित आहे.

महापुराने शाळेलाही गिळंकृत केलं

‘द टाइम्स’च्या वृत्तानुसार, काँक्रीटपासून बनलेली आणि नदीपासून सुमारे ६० मीटर उंचीवर असलेली ही शाळा, गावाला पूर्व किनाऱ्याशी जोडणाऱ्या स्टीलच्या पुलाच्या पातळीवरच उभी होती. तेव्हाच एका पालकाने आत धावत येत आणखी एक चिंताजनक बातमी दिली, पाणी खूप वेगाने वाढत आहे. दावाडी यांनी ताबडतोब शाळेची घंटा वाजवली आणि शिक्षकांना वर्ग रिकामे करण्याचे आदेश दिले. त्यांनी शाळेच्या बस चालकांना फोन करून एकाशिवाय बाकीच्या सर्वांना मागे परतण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी पाहिलं की, ज्या बसचालकाशी त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता, ती बस पूल पार करत होती. तोपर्यंत मुलांनाही आपण संकटात असल्याची जाणीव होऊ लागली होती. एका मुलीला घाबरल्यामुळे पॅनिक अटॅक आला, तिला दुचाकीवजरून डोंगराच्या दिशेने वर नेण्यात आले.

‘द टाइम्स’नुसार, इतर मुले पायी पळाली आणि दावाडी त्यांच्या मागे-मागे गेले. अखेर पूर आल्यावर मुलांनी एका पिंपळाच्या झाडाखाली आश्रय घेतला आणि पुराच्या पाण्याने त्यांच्या शाळेची इमारत वाहून नेली. दावाडी यांच्या समयसुचकतेमुळे १,६४३ मुले आणि एका शिक्षकाव्यतिरिक्त इतर सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले.

पिंपळाच्या झाडाखाली घेतला आश्रय

सामाजिक इतिहास विषयाचे ३२ वर्षीय शिक्षक संतोष परियार हे नदीकाठच्या आपल्या भाड्याच्या खोलीत नाश्ता बनवण्यासाठी परत गेले असताना वाहून गेले. शाळेचे शिपाई सुलतान लामा हे देखील शाळेचे दरवाजे बंद करण्यासाठी परत गेले असता मरण पावले. ‘मी दुसरं काय करू शकत होतो?’स्थानिक लोकांनी मुलांचे प्राण वाचवल्याबद्दल दावाडी यांना ‘हिरो’म्हटलं आहे. पण स्वतः दावाडी यांना तसं वाटत नाही.

“मी आता बत्तर येथे पोहोचलो आहे. जेव्हा आम्ही शाळेतून बाहेर पडलो, तेव्हा आम्ही टेकडीच्या दिशेने गेलो. तिथे जे काही उपलब्ध होईल त्याआधारे आम्ही दिवस काढले. आम्ही तिथे जवळपास अडकूनच पडलो होतो”, असं दवादी यांनी नेपाळचे स्थानिक वृत्तपोर्टल ‘ऑनलाईन खबर’शी बोलताना सांगितलं. “माझ्यासोबत सुमारे ४०-५० विद्यार्थी आणि कर्मचारी होते. आज आम्हा सर्वांची सुटका करण्यात आली आहे.”

आणखी १५ विद्यार्थी बचावाच्या प्रतीक्षेत

दवादी यांनी सांगितलं की, उंचीवर गेलेले इतर १५ विद्यार्थी अजूनही दुसऱ्या एका ठिकाणी अडकलेले आहेत. स्थलांतरादरम्यान शाळा सोडलेले काही विद्यार्थी नातेवाईकांकडे किंवा इतर ठिकाणी आश्रयाला गेले होते. दावादी आणि त्यांच्या गटाची सुटका झाल्याचं समजल्यानंतर, त्यातील काही जण त्याच ठिकाणी जमा झाले. “मी आधीच लष्कराला त्यांना वाचवण्याची विनंती केली आहे”, ते म्हणाले. “त्यांनी सांगितले की आज ते शक्य होणार नाही आणि ते उद्या दिवसभरात ही मोहीम राबवतील.”

दावादी यांच्या मते, केवळ दोन किंवा तीन विद्यार्थी अजून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचले नसल्याची शक्यता आहे. काही प्रकरणांमध्ये संपर्क साधणे अशक्य झालं आहे कारण ज्या घरांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलं होतं, ती घरेच पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. “जर त्यांची घरे आणि संपूर्ण बाजारपेठच वाहून गेली असेल, तर त्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे काय झाले हे सांगणे कठीण आहे”, ते म्हणाले. “त्यांच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. पण आम्ही इतरांच्या संपर्कात आहोत.” शाळेचे दोन कर्मचारी शिक्षक संतोष परियार आणि एक कार्यालयीन सहाय्यक हे देखील अद्याप संपर्काबाहेर असल्याचे दवादी यांनी सांगितले.