scorecardresearch

BLOG: २०२१ मध्ये ‘शिवाजी’ तामिळनाडूचा बिग बॉस बनणार ?

राजकारण आणि चित्रपट ही दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत. पण पूर्वीपासून या दोन्ही क्षेत्रांचा दृढ संबंध राहिला आहे. राजकारण्यांना चित्रपटात उत्तम अभिनय करणे जमणार नाही पण अभिनेते मात्र उत्तम राजकारणी बनू शकतात.

BLOG: २०२१ मध्ये ‘शिवाजी’ तामिळनाडूचा बिग बॉस बनणार ?

राजकारण आणि चित्रपट ही दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत. पण पूर्वीपासून या दोन्ही क्षेत्रांचा दृढ संबंध राहिला आहे. राज बब्बर, जया प्रदा, हेमा मालिनी, सुनील दत्त, जया बच्चन, धर्मेंद्र, किरण खेर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा या नावांवरुन आपल्याला राजकारण आणि चित्रपटांचा संबंध लक्षात येईल. राजकारण्यांना चित्रपटात उत्तम अभिनय करणे जमणार नाही पण अभिनेते मात्र उत्तम राजकारणी बनू शकतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील गोविंदा, अमिताभ, धर्मेंद्र ही नावं सोडली तर अन्य अभिनेते-अभिनेत्रींनी आज राजकारणी म्हणून उत्तम जम बसवला आहे.

चित्रपटातील कारकीर्द उतरणीला लागली अनेक प्रख्यात अभिनेते, अभिनेत्री राजकारणाचा मार्ग निवडतात. काही जण यशस्वी होतात तर काहींना पाच वर्षातच गाशा गुंडाळावा लागतो. गोविंदा त्याचे उत्तम उदहारण आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने गोरेगाव, दहीसर, वसई-विरार पट्टयातून राम नाईक सारख्यांना दिग्गज नेत्याचा पराभव करुन मोठा विजय मिळवला. पण पाच वर्षातच मतदारांना आपली चूक लक्षात आली आणि गोविंदालाही. जे हिंदीमध्ये चालते तोच ट्रेंड दक्षिणेतही आहे. फरक इतकाच आहे कि, हिंदीमधल्या कलाकारांना मतदार जास्तीत जास्त आमदार, खासदार बनवतात. पण दक्षिणेत चाहते आपल्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रीला थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवतात. दक्षिणेत तर लोकप्रिय कलाकाराने मुख्यमंत्री बनण्याची परंपराच आहे.

नानदामुरी ताराका रामाराव म्हणजेच एनटीआर राजकारणात येण्यापूर्वी तेलगु चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. आपल्या चित्रपटसृष्टीतील वलयाचा त्यांनी राजकारणात जम बसवण्यासाठी पुरेपूर वापर करुन घेतला. १९८२ साली त्यांनी तेलगु देसम पार्टीची स्थापना केली व थेट राज्याची सत्ता मिळवली. सातवर्ष त्यांनी आंध्रप्रदेशच मुख्यमंत्रीपद भूषवलं. शेजारच्या तामिळनाडूत तर ७० च्या दशकापासून चित्रपट सृष्टीतील व्यक्तिंनीच सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

१९६९ साली अण्णादुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. राजकीय नेता म्हणून ओळख प्रस्थापित करण्याआधी करुणानिधी सुप्रसिद्ध पटकथा लेखक होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध तामिळ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. करुणानिधी यांच्यानंतर एमजी रामचंद्रन तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. ते सुद्धा तामिळ सुपरस्टार होते. एमजीआर द्रमुकमध्ये होते. पण करुणानिधी यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी अण्णाद्रमुक हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला व थेट राज्याची सत्ता मिळवली. एमजीआर १९७७ ते १९८७ पर्यंत म्हणजे १० वर्ष तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते.

एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांच्याच पक्षाच्या जयललिता यांनी अण्णाद्रमुकवर आपली पकड घट्ट करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. जयललिता सुद्धा तामिळ चित्रपटातील लोकप्रिय नायिका होत्या. आता अण्णाद्रमुकचेच पलानीस्वामी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. पण २०२१ च्या विधानसा निवडणुकीत तामिळनाडूत वेगळे राजकीय चित्र दिसू शकते. शिवाजी राव गायकवाड म्हणजे सुपरस्टार रजनीकांत किंवा कमल हासन तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी दिसू शकतात.

तामिळ आणि हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवल्यानंतर या दोघांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांची तामिळनाडूतील लोकप्रियता पाहून अवाक व्हायला होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी पूजा अर्चा, फोटोवर दुग्धाभिषेक असे प्रकार दिसतात. त्यावरुन त्यांची अचाट लोकप्रियता लक्षात येते. कमल हासन एक संवेदनशील अभिनेते म्हणून ओळखले जातात. या दोघांची तामिळनाडूतील जनमानसावर चांगली पकड आहे.

तामिळनाडूतील सद्य राजकीय परिस्थिती लक्षात घेतली या दोघांन राज्याची सत्ता मिळवण्याची चांगली संधी आहे. कारण जयललिता आणि करुणानिधी या दोन्ही दिग्गज नेत्यांचे निधन झाल्याने राज्यात नेतृत्वाची एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष सत्तेवर असला तरी तिथे पनीरसेल्व आणि पलानीसामी असे दोन गट आहेत आणि करुणानिधी यांच्यानंतर त्यांचे पुत्र स्टालिन राजकीय वारसदार असले तरी तिथेही भाऊबंदकी होण्याची दाट शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी करुणानिधी यांचा राजकीय वारस कोण? यावरुन द्रमुकमध्ये वाद झाला होता. आता कानिमोळी यांच्यारुपाने स्टालिनसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यातील जनतेने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांच्या सत्तेचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे रजनीकांत किंवा कमल हासन या नव्या नेत्यांना संधी देऊ शकतात. तामिळनाडूतील अनेक सामाजिक प्रश्नांवर या दोन्ही अभिनेत्यांनी अनेकवेळा ठोस भूमिका घेतली आहे तसेच लोकप्रिय कलाकाराला मुख्यमंत्री बनवण्याची या राज्याची पंरपरा आहे. त्यामुळे उद्या रजनीकांत किंवा कमल हासन तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-08-2018 at 13:19 IST

संबंधित बातम्या