तमिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. अभिनेता विजय याने विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता सुपरस्टार रजनीकांत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “विजय राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं ऐकून मला प्रचंड धक्का बसला,” असं मत रजनीकांत यांनी व्यक्त केलं आहे. चेन्नईतील पोएज गार्डन या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निवडणुकीच्या निकालानंतर रजनीकांत यांनी द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली होती. याच टीकेला उत्तर देण्यासाठी आणि आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी रजनीकांत यांनी आज जाहीरपणे माध्यमांशी संवाद साधला.

‘विजयने स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवलं’

मुख्यमंत्री विजय आणि आपल्यातील संबंधांवर बोलताना रजनीकांत म्हणाले, “विजय मुख्यमंत्री झाल्याची बातमी जेव्हा माझ्या कानावर आली, तेव्हा मला खरोखरच मोठा धक्का बसला. मी आता राजकारणात सक्रिय नाही. राजकारणापासून दूर जाऊन मला आता अनेक दिवस झाले आहेत. माझ्या आणि विजयच्या वयात २८ वर्षांचं अंतर आहे. तमिळनाडूतील दोन बलाढ्य राजकीय पक्षांसमोर आव्हान उभं करत विजयने स्वतःच्या हिंमतीवर ही ओळख आणि यश मिळवलं आहे.”

…म्हणून मला समोर यावं लागलं!

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करत रजनीकांत म्हणाले, “निवडणुकीच्या निकालांनंतर माझ्यावर सातत्याने विविध स्तरांतून टीका केली जात आहे. जर मी आज यावर काहीच बोललो नाही, तर लोकांकडून ती टीकाच ‘सत्य’ मानली जाईल. म्हणूनच मला आज माध्यमांसमोर येऊन वस्तुस्थिती मांडणं गरजेचं वाटलं.”

स्टॅलिन यांच्याशी असलेल्या मैत्रीची दिली ग्वाही

निवडणुकीत पराभूत झालेल्या एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतल्याप्रकरणी होणाऱ्या टीकेलाही रजनीकांत यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, “आमची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे. कुळथूर मतदारसंघातून एम. के. स्टॅलिन यांचा पराभव झाला, याचं मला मनातून वाईट वाटलं. कोणत्याही विषयावर विनाकारण किंवा खालच्या पातळीवर जाऊन बोलणारा रजनीकांत नक्कीच नाही.”

तमिळनाडूच्या राजकारणात नवी समीकरणं

तमिळनाडूच्या राजकारणात नेहमीच चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचं एक वेगळं समीकरण राहिलं आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता अभिनेता विजयनेही थेट सत्तेची सूत्रं हाती घेतली आहेत. अशातच, सुपरस्टार रजनीकांत यांनी विजयच्या या अनपेक्षित विजयावर आणि स्टॅलिन यांच्यासोबतच्या वैयक्तिक संबंधांवर दिलेली ही प्रतिक्रिया सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे.