राजकारणात उतरण्याचे संकेत देणारे सुपरस्टार रजनीकांत हे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. भाजपने रजनीकांत यांच्याशी संपर्क साधला असून याविषयीचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही असे सूत्रांनी सांगितले.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. सध्या माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. काही कामं आहेत. तुमच्याबाबतीतही तसंच आहे. पण जेव्हा अटीतटीची वेळ येईल तेव्हा सर्वांनाच कळेल’ असे सूचक विधान रजनीकांत यांनी केले होते. तेव्हापासून रजनीकांत हे राजकारणात उतरण्याची चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांच्यातील मैत्री सर्वश्रूत असून रजनीकांत भाजपमध्ये जातील अशी चिन्हे आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात रजनीकांत मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत येण्याची शक्यता आहे. दोघांमध्ये सविस्तर चर्चा होणार असून यानंतरच रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित प्रवेशाची घोषणा केली जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या तामिळनाडूमधील नेत्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्हाला या घडामोडींविषयी माहित नाही असे भाजपचे स्थानिक नेते सांगतात. पण तामिळनाडूमधील एका वरिष्ठ नेत्याच्या मते भाजप आणि एआयएडीएमकेमधील तणाव निवळण्याची गरज असून दोन्ही पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. भाजप भविष्यात जो काही निर्णय घेईल त्यात एआयएडीएमकेने साथ देणे गरजेचे आहे असेही या नेत्याने सांगितले. पनीरसेल्वम अपयशी ठरले असले तरी विद्यमान मुख्यमंत्री ई. पलनीस्वामी यांच्याकडे धोरण चांगले आहे. आम्हाला एआयएडीएमकेसोबत युती कायम ठेवण्याची इच्छा आहे असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले. तर पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत भाजप आणि रजनीकांत कोणतीही राजकीय घोषणा करणार नाही असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

भाजपच्या महासचिव व्ही. श्रीनिवासन यांनी चेन्नईत दोन आठवड्यांपूर्वी ई.पलनीस्वामींची भेट घेतली होती. ही राजकीय भेट नसल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले असले तरी एआयएडीएमके आणि भाजपमधील दुरावा कमी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याची चर्चा आहे.

गेल्या रविवारी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू दिल्लीतून अधिकाऱ्यांची फौज घेऊन चेन्नईत आले होते. राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी सुमारे एक हजार कोटींचे प्रकल्प मार्गी लावले होते. भाजपला तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेसोबत युती हवी आहे, पण त्यासोबतच त्यांना पक्षात रजनीकांत यांच्यासारखा सक्षम व्यक्तींही हवा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे रजनीकांत भाजपत गेल्यास तामिळनाडूमध्ये त्यांची ताकद वाढणार असा अंदाज आहे.