Rajkot Doctor Secretly Films Female Colleague: राजकोटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका डॉक्टरने क्लिनिकमध्ये छुपा कॅमेरा लावून सहकारी महिला डॉक्टरचे खासगी क्षण चित्रीत करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकतर्फी प्रेमातून कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कमल नंदा असे आरोपीचे नाव असून, त्याने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. राजकोट सायबर क्राईम पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, साधू वासवानी रोडवरील एका क्लिनिकमधील प्रसूती कक्षात बल्ब होल्डरमध्ये गुप्तपणे स्पाय कॅमेरा बसवण्यात आला होता.
२०२३ पासून प्रकार सुरू
लाईट सुरू होताच हा कॅमेरा रेकॉर्डिंग करत असे आणि ते फुटेज मेमरी कार्डमध्ये साठवले जात होते. आरोपी ठराविक कालावधीनंतर मेमरी कार्ड बदलून रेकॉर्डिंग गोळा करत असल्याचे तपासात उघड झाले असून, हा प्रकार २०२३ पासून सुरू असल्याचा संशय आहे.
३,००० हून अधिक व्हिडिओ जप्त
तपासादरम्यान पोलिसांनी ३,००० हून अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत. या व्हिडिओंमध्ये तक्रारदार डॉक्टर आणि त्यांच्या महिला सहकारी यांचे खाजगी क्षण चित्रीत झाल्याचे समोर आले आहे.
२५ लाखांची खंडणी
आरोपीने काही व्हिडिओ स्थानिक मध्यस्थ आणि पत्रकार असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तींना शेअर केल्याचा आरोप आहे. त्यानंतर २५ लाख रुपयांची खंडणी न दिल्यास हे फुटेज सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली. आतापर्यंत पीडितांकडून सुमारे ५०,००० रुपये उकळल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
१२ जणांवर गुन्हे दाखल
पोलीस उपआयुक्त (गुन्हे) जगदीश बंगारवा यांनी सांगितले की, आरोपीकडे बीएचएमएस पदवी असून त्याला क्लिनिकमध्ये सहज प्रवेश होता. त्यामुळे कोणाच्याही लक्षात न येता त्याने कॅमेरा बसवला. या प्रकरणात एकूण १२ जणांची नावे समोर आली असून, त्यांच्यावर खंडणी, गुन्हेगारी कट, धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २०२४ पासून पीडितांना वारंवार धमक्या देण्यात येत होत्या. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, सर्व आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
