लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तुफान कलगीतुरा रंगल्याचंही दिसून येत आहे. एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात समोरच्या बाजूला असणाऱ्या नेत्याला लक्ष्य करण्याची एकही संधी नेतेमंडळी सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे दोन आठवडे शिल्लक असताना हा प्रचाराचा जोर वाढला आहे. त्यातच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात जाहीर प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर परखड शब्दांत टीका केली. त्याचवेळी त्यांनी राहुल गांधींनाही शेलक्या शब्दांमध्ये लक्ष्य केलं. राहुल गांधींमुळे काँग्रेस देशातून संपली, असा थेट दावाच राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केला. त्याचवेळी त्यांनी राहुल गांधींची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्याशी केल्यामुळे त्यांच्या या विधानावरून चर्चा रंगू लागली आहे.

देशातून काँग्रेस आता संपली आहे – राजनाथ सिंह

एकेकाळी देशभर वर्चस्व असणारी काँग्रेस आता संपली आहे, असा दावा त्यांनी केला. “काँग्रेस देशभरात संपली आहे. भारताच्या राजकारणात कधीकाळी ज्या काँग्रेसचं पूर्णपणे वर्चस्व होतं, भारतातील बहुतांश राज्यांमध्ये ज्या काँग्रेसची सरकारे होती, ती काँग्रेस आता संपली आहे. अगदी मोजक्या लहान लहान राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारं उरली आहेत”, असं राजनाथ सिंह म्हणाले.

राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”

“राजकारणातले अव्वल फिनीशर राहुल गांधी”

यावेळी राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाचा उल्लेख केला. “मी कधीकधी विचार करतो की काँग्रेसचं असं का झालं असावं? त्यातून मी एका निष्कर्षावर पोहोचलो आहे. क्रिकेटमध्ये सर्वात नावाजलेला फिनीशर आहे महेंद्रसिंह धोनी. मग भारताच्या राजकारणातला सर्वात अव्वल फिनिशर कोण आहे असं कुणी मला विचारलं, तर मी म्हणेन राहुल गांधी”, असा खोचक टोला यावेळी राजनाथ सिंह यांनी लगावला.

“भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न कराल तर…”

यावेळी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी असणारे राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविषयीही भाष्य केलं. “आम्हाला आमच्या शेजारी देशांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. कारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे की आपण आपले मित्र बदलू शकतो, पण शेजारी बदलू शकत नाही. आम्ही हे तत्व नेहमी पाळतो. पण जर कुणी भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh compares rahul gandhi with ms dhoni as best finisher in politics pmw