Rajnath Singh Operation Sindoor: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर भारताने स्वेच्छेने आणि स्वतःच्या अटींवर थांबवल्याचे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. “भारत दीर्घ लढाईसाठी पूर्णपणे तयार होता, देशाची अतिरिक्त क्षमता, म्हणजेच, अचानक गरजेच्या वेळी क्षमता वाढवण्याची क्षमता, देखील उपलब्ध होती. ती केवळ त्यावेळी होती इतकेच नाही, तर ती आजही आमच्याकडे आहे आणि पूर्वीपेक्षाही अधिक चांगली आहे”, असेही सिंह म्हणाले. राजनाथ यांनी यावेळी पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला.

पाकिस्तान दहशतावादाचा अड्डा

दिल्लीत आयोजित एएनआय सुरक्षा परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते होते. “पाकिस्तान सारखा देश सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत आला आहे. पाकिस्तान आणि भारत एकाचवेळी स्वतंत्र झाले पण आज जगात भारताचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी मान सन्मान आहे. तशी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे तळ म्हणून ओळख निर्माण झाली आहे”, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. दहशतवाद नेहमीच सार्वजनिक शांतता, विकास आणि समृद्धीसाठी आव्हान देत राहिल, असे विचार सिंह यांनी मांडले.

ऑपरेशन सिंदूरवर भाष्य

राजनाथ सिंह यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना पाकिस्तानविरोधातील कारवाई भारताने स्वेच्छेने आणि स्वतःच्या अटींवर थांबवल्याचे सांगितले. “या ऑपरेशनच्यावेळी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात उत्तम संवाद आणि योग्य नियोजन असल्याचे दर्शन घडले. ऑपरेशन सिंदूर ७२ तासांत समाप्त झाले असले तरी त्यामागे मोठी तयारी होती. भारतीने मोठी लढाई करण्याची तयारी केली होती. आपली क्षमता, शस्त्रसाठा, स्वदेशी शस्त्रांवरील विश्वास आमच्या प्रतिबंध धोरणाचा भाग झाले आहेत”, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जगभरात भारताने निर्माण केलेल्या शस्त्रांवरील विश्वास वाढला असून, अनेक देशांकडून आता यासाठी मागणी केली जात आहे.

संघर्षावरुन दावे-प्रतिदावे

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय लष्कराने कृत्रिम बृद्धिमत्तेचा प्रभावी वापर केल्याचे राजनाथ यांनी या परिषदेत सांगितले. अत्याधुनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रासह इतर सुरक्षा यंत्रणांमध्ये एआयचा वापर केल्याचे सिंह यांनी सांगितले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबविल्याचा दावा होता. पण, भारताने हा फेटाळून लावला होता. पाकिस्तानने अमेरिकेच्या माध्यमातून केलेल्या विनंतीनंतर भारताने कारवाई थांबवली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. दुसरीकडे पाकिस्तानने मात्र या संघर्षात विजय झाल्याचे दावा करत जल्लोष केला होता.