Rajnath Singh Warning to Pakistan: पश्चिम बंगालवर हल्ला करण्याचे वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आसिफ यांनी चिथावणीखोर वक्तव्य करु नये असा सल्ला देताना राजनाथ सिंह यांनी, “बंगालकडे नजर टाकली तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे फक्त देवालाच माहीत”, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
राजनाथ सिंह यांचा इशारा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराणयुद्धाच्या काळात पाकिस्तानने काही आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रागाने लालबुंद झालेल्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पश्चिम बंगालमधील कोलकातावर हल्ला करण्याचे वक्तव्य केले होते. यावरुन राजनाथ सिंह यांनी आसिफ यांचा चांगलाच समाचार घेतला. “पाकिस्तानचे दोन तुकडे झाले तेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागले होते, त्यामुळे आसिफ यांनी अशी चिथावणीखोर वक्तव्य करू नये”, असे सल्ला सिंह यांनी दिला.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
राजनाथ सिंह यांनी एएनआयशी बोलताना आसिफ यांना स्पष्ट इशारा दिला. “आसिफ यांनी अशी चिथावणीखोर वक्तव्य करू नयेत. ५५ वर्षांपूर्वी त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागले होते, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. त्यांनी पश्चिम बंगालवर नजर टाकण्याचा प्रयत्न केला तर केवळ देवालाच माहीत यावेळी पाकिस्तानचे किती तुकडे होतील”, असे इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.
तृणमूल काँगेसची मोदी – शाह यांच्यावर टीका
आसिफ यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर तृणमूल काँगेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. कोलकाताला धमकी देणाऱ्या आसिफ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचे धाडस शाह यांच्यात नाही, अशी टीका बॅनर्जींनी केली. बंगालला धमकी देणाऱ्यांना तशाच तसे उत्तर देण्याची धमक स्वयंघोषित ५६ इंच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांमध्ये नाही, असेही बॅनर्जी म्हणाले होते.
अभिषेक बॅनर्जींचा सवाल
“बंगालमधील नागरिकांच्या जीवाची त्यांना पर्वा नाही अथवा ते ठोस भूमिका घेण्यास घाबरत आहेत. आणि जर त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी केंद्रीय दल, बीएसएफ आणि भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक द्यावी. नरेंद्र मोदींमध्ये हिंमत आहे का? अमित शाहमध्ये आहे का? राजनाथ सिंहमध्ये आहे का?” असेही अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
