दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना त्यांचे चाहते प्रेमाने थलायवा म्हणतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टी, हिंदी सिनेसृष्टीत रजनीकांत यांचे हजारो चाहते आहेत. वयाच्या ७५ व्या वर्षीही रजनीकांत चित्रपटांमध्ये काम करतात. त्यांची क्रेझ आजही कायम आहे. दरम्यान रजनीकांत त्यांच्या एका कृतीमुळे चर्चेत आहेत. रजनीकांत यांनी सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या पद्मा नावाच्या महिलेला आपल्या घरी बोलवलं आणि तिचा सत्कार करुन तिला सोन्याची चेन भेट म्हणून दिली.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
रजनीकांत हे पद्मा नावाच्या सफाई कामगार महिलेला सोन्याची चेन देत असतानाचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांना सुरुवातीला वाटलं की स्टार रजनीकांत यांची फॅन असलेल्या पद्माला ते सोन्याची चेन देत आहेत. मात्र हे कारण नव्हतं. सोन्याची चेन त्यांनी पद्माला का दिली? जाणून घेऊ.
रजनीकांत यांच्या टीमने काय सांगितलं?
रजनीकांत यांच्या टीमने सोशल मीडियावर हे स्पष्ट केलं आहे की सुपरस्टार रजनीकांत यांनी फ्रंटलाइन वर्कर पद्माला सोन्याची चेन देऊन तिचा सत्कार केला आहे. त्यामागे कारण आहे ते म्हणजे पद्माला तिचं काम करत असताना एक पाऊच मिळालं होतं. त्यात साधारण ३६० ग्रॅम सोन्याचे दागिने होते. सोनं पाहूनही पद्मा यांनी ते स्वतःकडे ठेवलं नाही. उलट तिच्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आणि ते पाऊच पोलीस ठाण्यात जमा केलं. पोलिसांनी या सोन्याबाबत तपास केला आणि ज्या व्यक्तीचं सोनं होतं त्याला ते परत केलं. पद्माचा हा प्रामाणिकपणा रजनीकांत यांना भावला आणि त्यामुळेच त्यांनी सोन्याची चेन देऊन पद्माचा सत्कार केला. पद्माला जो पाऊच मिळाला त्यातल्या दागिन्यांची किंमत साधारण ४५ ते ५० लाखांच्या घरात होती. पद्मा यांना तर रजनीकांत यांनी तिच्या प्रामाणिकपणाबद्दल सोन्याची चेन देऊन तिचा सत्कार केला.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनीही केलं पद्माचं कौतुक
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनीही पद्मा नावाच्या सफाई कामगार महिलेच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे. स्टॅलिन यांनीही पद्माचा सत्कार केला आणि तिला एक लाख रुपयांचा चेक बक्षीस म्हणून दिला. रजनीकांत जेव्हा यांना ही बाब समजली तेव्हा त्यांनीही तिला घरी बोलवलं, सोन्याची चेन भेट म्हणून दिली आणि तू एक सच्ची व्यक्ती आहेस म्हणत तिचा सत्कार केला.

