राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी काँग्रेस अध्यपदासाठी निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज ( २५ सप्टेंबर ) राजस्थान काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत नवा मुख्यमंत्री कोण होणार, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे महासचिव आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची बैठक होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, “काँग्रेस अध्यपदासाठी ने निवडणूक लढणार आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार? याचा निर्णय पक्ष घेईल.” मात्र, गेहलोत यांच्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन पायलट की अन्य कोण? मुख्यमंत्रीपदी होणार हे पाहावे लागणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अजय माकन यांन काँग्रसेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत राजस्थानच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं. तर, सचिन पायलट यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी आणि काही आमदारांसोबत चर्चा केली. सचिन पायलटच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, सी. पी. जोशी यांच्याही नावाची राजस्थानमध्ये चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर, मालमत्ता, ठेवी, सोनं किती?; आकडेवारी पाहून थक्क व्हाल

गेहलोत यांचा पायलट यांच्या नावाला विरोध

काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाची ७१ वर्षीय अशोक गेहलोत यांच्या नावाला पसंती आहे. पण, अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपद सोडू इच्छित नाहीत. जर आपण मुख्यमंत्रीपद सोडलं तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट मुख्यमंत्री होतील अशी त्यांना भीती आहे. २०२० मध्ये सचिन पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड पुकारुन जवळपास सरकार पाडलं होतं.