शिवसेना-भाजप-रिपाइं यांच्या महायुतीत लोकसभा व विधानसभेसाठी जागांमध्ये खेचाखेची सुरू असतानाच यात नव्याने सहभागी झालेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभेसाठी ५४ जागा देण्याची मागणी भाजप-सेनेकडे केली आहे. कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, नांदेडमध्ये शेतकरी संघटना प्रबळ असल्याचा दावा करीत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी महायुतीच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा जागावाटपावर निर्णय होईल, असे शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले की, लोकसभेसाठी माढा व हातकणंगले मतदारसंघ शेतकरी संघटनेला देण्यास भाजप व शिवसेना नेते अनुकूल आहेत. परंतु त्याबरोबरच कोल्हापूर व बारामती मतदारंसघदेखील आम्हाला हवा आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड, शाहूवाडी, हातकणंगले, राधानगरी, करवीर तर सांगली जिल्ह्य़ातील शिराळा, वाळवा, जत, मिरज हे मतदारसंघ महायुतीने स्वाभिमानीला द्यावेत. याशिवाय पुणे जिल्ह्य़ात इंदापूर, बारामती व दौंडमध्ये स्वाभिमानीचे अनेक समर्थक आहेत. येथेही आम्ही लढण्यास इच्छुक आहोत. सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस, पंढरपूर, करमाळ्यासह नांदेड, बुलढाणा, लातूर, नाशिक जिल्ह्य़ातून प्रत्येकी दोन तर अहमदनगर जिल्ह्यातून तीन जागा स्वाभिमानीला देण्याची मागणी शेट्टी यांनी केली. विधानसभेसाठी मागणाऱ्या जागांवर तुरळक अपवाद वगळता भाजप व शिवसेनेला यश आलेले नाही. अशा ठिकाणी शेतकरी संघटना प्रबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभाव असणारे मतदारसंघच स्वाभिमानीला हवे आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.