नवी दिल्ली : राज्यसभेच्या २७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली. १८ जूनला १० राज्यांतील जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोआ) राज्यसभेतील ताकद किंचित वाढून ती १५० सदस्यांचा टप्पा पार करू शकेल. सध्या ‘रालोआ’कडे राज्यसभेत १४८ सदस्य असून या निवडणुकीत १६ ते १८ जागा जिंकण्याची शक्यता आहे.

संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील अनेक दिग्गज नेत्यांची मुदत जून व जुलै महिन्यांमध्ये संपुष्टात येईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह तसेच केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू आदींचा कार्यकाळ संपेल.

कर्नाटकातून खरगेंची फेरनिवड निश्चित

कर्नाटकमधील चार जागा विशेष चर्चेत आहेत. विधानसभा संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता असून मल्लिकार्जुन खरगे यांच्या फेरनिवडीचा मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वाय. एस. शर्मिला यांना कर्नाटकमधून उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. माजी पंतप्रधान देवेगौडा यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेशातील तीन जागांसाठी काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप दोन जागा सहज जिंकण्याच्या स्थितीत असून केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. काँग्रेसकडे एक जागा जिंकण्याइतके संख्याबळ असून ६ अतिरिक्त मते आहेत. राजस्थानातील तीन जागांपैकी दोन जागा भाजप आणि एक जागा काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकते. भाजपकडून केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांच्या नावाची चर्चा होत आहे.

गुजरातमधून काँग्रेसला यावेळी एकाही उमेदवाराला राज्यसभेवर पाठवता येण्याची शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसू शकतो. पक्षाचे एकमेव राज्यसभा सदस्य शक्तीसिंह गोहिल यांच्यानंतर राज्यसभेत काँग्रेसचे गुजरातमधून प्रतिनिधित्वच न राहण्याची शक्यता आहे. भाजप सर्व चार जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्ष-भाजप-जनसेना आघाडीचे विधानसभेत स्पष्ट बहुमत असल्याने चारही जागा ‘रालोआ’च्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये एक जागा ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. काँग्रेसला मित्रपक्ष झारखंड मुक्ती मोर्चाकडून (झामुमो) एका जागेसाठी पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.

‘रालोआ’ अधिक मजबूत

या निवडणुकांमुळे राज्यसभेतील सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. सध्या ज्या २७ जागांवर मतदान होणार आहे, त्यापैकी १८ जागा ‘रालोआ’कडे, ४ जागा काँग्रेसकडे, ३ जागा ‘वायएसआर काँग्रेस’कडे, झारखंड मुक्ती मोर्चा व बिजू जनता दलाकडे प्रत्येकी १ जागा आहे. यंदाच्या निवडणुकीत तेलुगू देसमच्या जागा वाढतील, शिवाय ओडिशात भाजपची एक जागा वाढेल. त्यामुळे रालोआचे संख्याबळ एखाद-दोन जागांनी वाढू शकेल. सध्या, राज्यसभेतील २४४ जागांपैकी १४८ जागा ‘रालोआ’कडे असून विरोधी पक्षांकडे ७८ जागा आहेत. १७ जागांचा कोणत्याही आघाडीत समावेश नाही.

महाराष्ट्र, तमिळनाडू, ओडिशामध्ये पोटनिवडणूक

महाराष्ट्र, तमिळनाडू व ओडिशामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी महायुतीमध्ये उमेदवारीवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होत आहे. तमिळनाडूमध्ये ‘अण्णाद्रमुक’चे माजी मंत्री सी. व्ही. षण्मुगम यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ७ मे रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे इथे पोटनिवडणूक होत असून सत्ताधारी ‘टीव्हीके’चा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. बिजू जनता दलातून बाहेर पडून भाजपमध्ये जाणारे देबाशिष सामंतराय यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ओडिशात पोटनिवडणूक होत आहे. ही जागा भाजपच्या पारड्यात पडू शकते.

या राज्यांत निवडणूक

आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक (प्रत्येकी ४), मध्य प्रदेश व राजस्थान (प्रत्येकी ३), झारखंड (२) अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम (प्रत्येकी १). याव्यतिरिक्त, महाराष्ट्र, तामिळनाडू व ओदिशामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक.