Sadanandan Master in Rajya Sabha: अर्थसंकल्प सादरीकरण झाल्यानंतर सोमवारी संसद अधिवेशनात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकारीच चर्चा पाहायला मिळाली. या पुस्तकातील चीनच्या घुसखोरीसंदर्भातील उल्लेखावर मोठा गदारोळ झाला. दिवसभर याच मुद्द्यावर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या. पण याचदरम्यान राज्यसभेतील एका सदस्यानं केलेली कृती फक्त राजकीय वर्तुळच नव्हे, तर प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावरदेखील चर्चेत आली. हे खासदार होते राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य सी. सदानंदन मास्टर! सदानंदन मास्टर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला केलेल्या कृतीमुळे राज्यसभेतही काही काळ अस्वस्थता पसरली!

काय केलं सी. सदानंदन मास्टर यांनी?

राज्यसभेत सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदनपर प्रस्तावावर सदस्यांची भाषणं चालू होती. सी. सदानंदन मास्टर यांना भाषणाची संधी देताच त्यांनी आपले दोन्ही कृत्रिम पाय काढून बाकावर ठेवले. त्यांची ही कृती पाहून राज्यसभेत उपस्थित खासदारांमध्ये काही काळ अस्वस्थता पसरली. त्यांच्या या कृतीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) खासदार जॉन ब्रिट्स यांनी तीव्र आक्षेप घेतला. या कृतीवर राज्यसभा सभापतींनी तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सदानंदन मास्टर यांना कृत्रिम पाय बाकावरून हटवण्याचे निर्देश दिले. तसेच, सभागृहात बॅनर्स झळकावण्यास मनाईसंदर्भातील नियमांचं या बाबतीतदेखील पालन करावं, असंही सांगितलं.

सदानंदन मास्टर यांनी असं का केलं?

सदानंदन मास्टर यांनी कृत्रिम पाय टेबलवर ठेवून आपलं मनोगत व्यक्त करताना १९९४ सालच्या एका घटनेचा उल्लेख केला. सदानंद मास्टर हे निवृत्त शिक्षक असून सध्या ते केरळ भाजपाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान १९९४ साली माकपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला.

“आज जे लोकशाहीबाबत बोलत आहेत, त्यांनी ३१ वर्षांपूर्वी माझ्यावर हल्ला केला होता. माझ्या बहिणीच्या लग्नाबद्दल चर्चा करून मी माझ्या काकांच्या घरून परत येत होतो. बाजारपेठेत बसमधून उतरताच काही गुंडांनी मला घेराव घातला. त्यांनी माझे दोन्ही पाय कापले आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत ते निघून गेले. त्यामुळे मला या सभागृहातल्या सदस्यांना हे दाखवायचं होतं की लोकशाही काय असते”, असं सदानंदन मास्टर भाषणात म्हणाले.

हल्ला झाला तेव्हा सदानंदन मास्टर हे कन्नूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह म्हणून काम पाहात होते. RSS मध्ये दाखल होण्याचा त्यांचा निर्णय न पटल्यामुळे माकपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

CPI(M) ला केलं लक्ष्य!

दरम्यान, सदानंदन मास्टर यांनी सभागृहात बोलताना माकपच्या सदस्यांना लक्ष्य केलं. सभागृहातील माकपच्या सदस्यांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही लोक नेहमीच सहिष्णुता, मानवता अशा गोष्टींबद्दल बोलता. पण तुमची बांधिलकी राजकीय हिंसेशी आहे. हे लोकशाहीसाठी अजिबात योग्य नाही. मला वाईट वाटतंय की माकपच्या अत्याचारांमुळे संसदेतल्या माझ्या पहिल्या भाषणासाठी मला उभं राहाता येत नाहीये”, असंही ते म्हणाले.