पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतानाच चेन्नईमध्येही बेदरकार वाहन चालवून एका व्यक्तीला चिरडण्याचा प्रकार सोमवारी (१७ जून) घडला आहे. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार असलेल्या बीडा मस्तान राव यांच्या मुलीने महागड्या बीएमडब्लू कारने पथपथावर झोपलेल्या एका युवकाला चिरडले. मृत युवकाचे नाव सूर्या (वय २१) असल्याचे कळते. सूर्या पेंटरचे काम करायचा. अपघाताच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत पदपथावरच झोपला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या अपघातानंतर खासदारांची मुलगी माधुरी रावला अटक करण्यात आली होती. मात्र काही वेळाने तिला जामीन देण्यात आला.

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कारच्या अपघाताला एक महिनाही अद्याप उलटलेला नाही, तोच महाराष्ट्रासह अन्य राज्यातही अशाच प्रकारच्या घटन समोर येत आहेत. पुण्यातील बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोन संगणक अभियंत्याच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.

पीटीआय वृत्तसंस्थेने चेन्नईमधील अपघाताबाबत वृत्त दिले आहे. चेन्नई पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मृत युवक सूर्या सोमवारी रात्री चेन्नईच्या एका पदपथावर झोपला होता. यावेळी भरधाव बीएमड्ब्लू कारने सूर्याला चिरडले. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी माधुरी राव गाडी चालवत होती, तर तिच्यासह आणखी एक महिला होता. अपघात होताच दोघींनीही घटनास्थळावरून पळ काढला.

ट्राफिक पोलीस तपास विभागाने भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील प्रकरणात हेच कलम सुरुवातीला लावण्यात आले होते. हे कलम जामीनपात्र असल्यामुळे माधुरी रावला जामीन मिळणे सोपे झाले. पोलिसांनी कारच्या मालकालाही नोटीस पाठविली आहे.

एनडीट्व्हीने दिलेल्या बातमीनुसार अपघात झाल्यानंतर माधुरी रावने घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. तर तिच्या मैत्रिणीने तिथे जमलेल्या स्थानिकांशी सुरुवातीला वाद घातला. मात्र वाद वाढताच तिनेही घटनास्थळावरून काढता पाय घेतला. स्थानिकांनी सूर्याला रुग्णालयात हलविले, मात्र जबर जखम झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत सूर्याचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच जे-५ शास्त्री नगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी धाव घेतली आणि न्याय मागण्याची मागणी केली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात सदर बीएमडब्लू कार खासदार बीडा मस्तान राव यांच्या बीएमआर या उद्योग समूहाची असल्याचे समोर आले आहे. कारची नोंदणी पुद्दूचेरी येथे केलेली आहे.

कोण आहेत बीडा मस्तान राव?

बीडा मस्तान राव हे वायएसआर काँग्रेस पक्षाकडून २०२२ साली राज्यसभेवर गेले. आंध्र प्रदेशचे मोठे व्यापारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे १६५ कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती आहे. बीडा मस्तान यांचा बीएमआर (बीडा मस्तान राव) या नावाने उद्योग समूह असून ते सीफुडच्या व्यवसायात गुंतले आहेत. बीडा मस्तान राव यांनी कावली या विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. आधी तेलगू देसम पक्षात असलेल्या राव यांनी २०१९ मध्ये वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Live Updates